बेकायदा होर्डिंग, स्वागत कमानींमुळे डोंबिवली विद्रुप; वृक्ष, सीसीटीव्ही, पथदिवे झाकोळले

होर्डिंग, स्वागत कमानी आणि फलकांनी वेढा दिला आहे. पालिकेची परवानगी न घेता नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जागा दिसेल तिथे फलक टांगलेले असतात. विशेष म्हणजे वृक्ष, सीसीटीव्ही, पथदिवेही झाकोळले गेले आहेत. बेकायदा बॅनरबाजीने डोंबिवली शहर विद्रुप आणि बकाल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

गणेशोत्सव संपला तरी शहरभर ल ावलेल्या अनधिकृत कमानी आणि बॅनर अजूनही काढलेले नाहीत. यामुळे शहर विद्रुप होतेच शिवाय रहदारीलासुद्धा अडथळा होत आहे. आता तर चक्क महानगरपालिकेचे कर्मचारीदेखील सत्ताधारी नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे अनधिकृत होर्डिंग लावून शहर बकाल करत आहेत. शुभेच्छांचे होर्डिंग वृक्षांवर आणि पथदिव्यांवर झळकवले आहेत.

डोंबिवलीच्या दत्तनगर परिसरात केडीएमसी कर्मचारी अरुण जगताप यांनी आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक झळकावले आहेत. डोंबिवलीच्या दत्तनगर परिसरात असलेल्या वृक्षांवर आणि पथदिव्यांवर केडीएमसी कर्मचाऱ्याने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे केडीएमसी आता अनधिकृत होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक ठाणे (ग्रामीण) प्रमोद कांबळे यांनी पालि का प्रशासनाला केला आहे.

शिंदे पिता-पुत्रांचा बॅनर चर्चेत
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरील तिसगाव नाका चौकात नवरात्रोत्सवाची स्वागत कमान उभारली आहे. भररस्त्यात दुतर्फा ३० फूट लांबीच्या लोखंडी कमानीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. या कमानीमुळे पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा पूर्णपणे झाकला गेला आहे. या ठिकाणी आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे.