कार गाडीला धडकताच गोवंश तस्करीचे भांडे फुटले; मुंब्रा, पडघा येथील दोघांना अटक

गोवंश हत्या आणि तस्करीला कायद्याने बंदी असतानाही समाजकंटक हे बेकायदा कृत्य करत आहेत. विरारमध्ये कार एका गाडीला धडकल्यामुळे गोवंश तस्करीचे भांडे फुटले. विरार पूर्वेतील शिरसाड नाक्यावर दोन वाहनांच्या अपघातानंतर कारमध्ये असलेल्या जनावरांनी हंबरडा फोडल्यानंतर एक आरोपी फरार झाला. तर ग्रामस्थांनी अब्दुल वाहिद (मुंब्रा) व बिलाल शेख (पडघा) या दोन तस्करांना पकडून मांडवी पोलिसांच्या हवाली केले.

मोकाट जनावरांना गुंगीचे इंजेक्शन
पहाटे पाच वाजता एक भरधाव चारचाकी कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड भागातून जात असताना तिची एका वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेनंतर कारमधून जनावरांचा हंबरडा ऐकू येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता कारमध्ये दाटीवाटीने चार जनावरे कोंबलेली दिसली. नागरिकांनी तातडीने कारमधील एक गाय आणि तीन बछड्यांची सुटका केली. जनावरांना शिवणसई येथील गोशाळेत नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गोवंश तस्करीच्या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंगीचे इंजेक्शन देऊन मोकाट जनावरांची तस्करी सुरू आहे. तस्करी रोखण्यासाठी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.