
वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) स्लॅबमध्ये बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गरजेची असलेली बॅग, बॉल पेन आणि छापील पुस्तकांवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर महागणार आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली आहे. जीएसटी स्लॅबमधील बदलानंतर जवळपास 1200 प्रकारच्या वस्तूंसाठी नवीन दरपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना लागणारे बॉल पॉइंट पेन, फेल्ट टिप्ड आणि अन्य टिप्ड पेन, मार्कर, फाउंटन पेन, स्टायलो ग्राफ पेन या सर्वांवर 18 टक्के जीएसटी लागू राहणार आहे. छापील पुस्तकांसाठी लागणाऱया अनकोटेड पेपरला जीएसटीच्या 18 टक्के श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे ही पुस्तके महागणार आहेत. याची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. त्यामुळे पालकांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे.
कोणत्या वस्तूंवर सूट?
पेन्सिल, क्रेयॉन, पेस्टल, ड्रॉइंग चॉक आणि खडू यांच्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून शून्य करण्यात आला आहे. तर सराव पुस्तके, ग्राफ, प्रयोगशाळेच्या वह्या आणि वह्यांसाठी वापरल्या जाणाऱया कागदांवर सूट देण्यात आली आहे. परंतु, सूट दिलेल्या वस्तूंच्या यादीत छापील पुस्तकांचा उल्लेख करण्यात आला नाही.