मी सर्व धर्मांचा आदर करतो! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्पष्टीकरण

भगवान विष्णूंच्या मूर्तींशी संबंधित प्रकरणात केलेल्या टिप्पणीबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली. मी सर्वच धर्मांचा आदर करतो. कोणाच्याही श्रद्धा वा धार्मिक भावना दुखावण्याचा माझा कदापि हेतू नव्हता, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यादिवशीच्या सुनावणीवेळी मी केलेले विधान सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असे ते म्हणाले.

‘जागतिक वारसास्थळ’ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची मागणी याचिकेतून केली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. त्यांच्या विधानावर नंतर सोशल मीडियात टीका झाली. त्या अनुषंगाने सरन्यायाधीशांनी गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली. ते प्रकरण भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या मंदिराशी संबंधित होते. त्या सुनावणीबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू असल्याचे मला कोणीतरी सांगितले. माझे विधान सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. मी सर्व धर्मांचा आदर करतो. कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या विधानानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या. तसेच ते विधान मागे घेण्याची मागणीही काही वकिलांनी केली. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी स्वतःच्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले.

सोशल मीडिया म्हणजे उधळलेला घोडा! – कपिल सिब्बल

सरन्यायाधीशांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियाबाबत चिंता व्यक्त केली. हे गंभीर आहे. आम्हाला न्यूटनचा तिसरा नियम माहीत होता की प्रत्येक क्रियेला विरुद्ध आणि समान प्रतिक्रिया असते. पण आता प्रत्येक क्रियेला सोशल मीडियात एक विसंगत प्रतिक्रिया असते, असे मत तुषार मेहता यांनी व्यक्त केले. सिब्बल यांनी अशाच प्रकारे चिंतेचा सूर आळवला. आपण दररोज हा त्रास सहन करीत आहे. सोशल मीडिया हा अनियंत्रित घोडा आहे, त्याला काबूत ठेवण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.