
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये दोन तरुण फुटपाथवर अतिशय धोकादायक व बेदरकारपणे बुलेट चालवत असल्याचे दिसत आहे. तसेच स्टंट करत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने दोघेही पडून गंभीर जखमी झाले होते. या तरुणांनी ही स्टंटबाजी रिल्स बनवण्यासाठी केल्याचे दिसून येत असल्याचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला. तसेच गेली तीन आठवडे उलटूनही पोलीस प्रशासन अनभिज्ञ राहिल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तपासात असे निष्पन्न झाले की, सदरची घटना ही दिनांक 26/8/2025 रोजी रात्री 12.30 वाजेची असून केवळ रिल्स बनवण्यासाठी, रात्रीच्या वेळी अतिशय धोकादायक अशी स्टंटबाजी या तरुणांनी केली केली आहे. या रिल्स बनवण्याच्या नादात मोटरसायकलचा अपघात होऊन स्वतः देखील गंभीर जखमी झाले आहे. त्यांनीच परस्पर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार देखील घेतले. त्यांच्या एका मित्राने या घटनेची रिल्स बनवून ती सोशल मीडियावर शेअर केली. सुदैवाने या घटनेत त्यांच्या शिवाय अन्य कोणी जखमी झाले नाही.
व्हिडीओ वरून पोलिसांच्या तपासाची चक्र गतीने फिरली. पोलिसांनी यातील तरुणांची ओळख उघड करताच यश अनुप अरगडे अरगडे आणि प्रतीक सचिन गुंजाळ यांच्यावर शहर पोलीस भारतीय न्याय संहिता कलम 281, 125, 49 सह कलम मोटर वाहन कायदा 184, 189 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून दोघांनाही नोटीस देण्यात आली असून दोघेही जखमी असल्याकारणाने त्यांच्याकडून लेखी माफीनामा घेण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत यांनी केली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.