
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला आणि मालिकेत बरोबरी साधली. ही जखम ताजी असतानाच ICC ने ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका दिला आहे. ICC ने ऑस्ट्रेलियाला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधानाने (117) दमदार शतक ठोकलं. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 292 धावा करत 293 धावांच आव्हान ऑस्ट्रेलियाला दिलं होतं. परंतु आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या तालावर नाचवलं आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 190 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाने 102 धावांनी मोठा विजय साजरा केला. परंतु या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार एलिसा हिलीने सुद्धा चूक मान्य केली. त्यामुळे सामना पंच वृंदा राठी आणि जननी नारायणन, तिसरे पंच लॉरेन अगेनबाग आणि चौथे पंच गायत्री वेणुगोपालन यांनी हा दंड ठोठावला आहे.