हिंदुस्थान आणि अमेरिकेचे संयुक्त अंतराळ मिशन

येत्या काळात हिंदुस्थान आणि अमेरिका चंद्र आणि मंगळ मोहिमांवर एकत्रित काम करणार आहेत. उभय देशांच्या संयुक्त भागीदारीत नासा आणि इस्रोचे निसार मिशन आणि एक्झिओम मिशन 4 यांचाही समावेश आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे नुकताच भविष्यातील अंतराळ भागीदारीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आगामी अंतराळ मोहिमांविषयी भाष्य करण्यात आले. येत्या दशकात मानवी उड्डाणाच्या सीमा आणखी विस्तारतील, अशा आशावाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले.

गगनयान मिशनसाठी ‘व्योममित्र’ हा एआय सक्षम अर्ध मानव रोबोट तयार करण्यात आला आहे. गगनयान मोहिमेत प्रक्षेपित होणार हा पहिला रोबोट असेल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. मानवाला 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवून पृथ्वीवर सुरक्षित आणणे हे गगनयानाचे उद्दिष्ट आहे. याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत मानवरहित यान पाठवायची योजना आहे. मोहिमेसाठी तापमान, दाब, आर्द्रता आणि कार्बन डायॉक्साईडसारख्या मुद्दय़ांवर लक्ष देण्याची गरज आहे, असे नारायणन म्हणाले. या कार्यक्रमात सुनीता विल्यम्स, निक हेग आणि शुभांशु शुक्ला ऑनलाईन सहभागी झाले.