सामना सुरू असताना वडिलांचे निधन झाले; घरी जाऊन क्रियाकर्म उरकले, दु:ख विसरून देशासाठी पुन्हा मैदानात उतरणार दुनिथ वेल्लालागे

आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असताना श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर तो तात्काळ घरी परतला होता. तिथे त्याने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि इतर क्रियाकर्म उरकले. त्यानंतर तो पुन्हा युएईला रवाना झाला. वडील गेल्याचे दु:ख विसरत दुनिथ वेल्लालागे देशासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे. सुपर-4मध्ये श्रीलंकेचा सामना बांगलादेशशी होणार असून या लढतीत दुनिथ खेळताना दिसेल.

गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असताना दुनिथ वेल्लालागे याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजरने दुनिथला ही दु:खत बातमी दिली. यानंतर तो तातडीने श्रीलंकेला रवाना झाला.

वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आणि त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तो एक क्षणही घरी थांबला नाही. शुक्रवारी रात्री तो टीम मॅनेजर महिंदा हालंगोडे यांच्यासोबत युएईला परतला. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपल्या एक्स अकाऊंटवर याबाबत अधिकृत माहिती दिलेली आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत सुपर-4 लढतीमध्ये श्रीलंकेचा संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. या लढतीसाठी दुनिथ वेल्लालागे उपलब्ध असणार आहे. वडिलांना श्रद्धांजली वाहून तो संघासोबत पुन्हा जोडला जाईल.

जयसूर्याने वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, श्रीलंकन संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी खेळाडू सनथ जयसूर्या यांनी दुनिथ वेल्लालागे याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, दुनिथ, तुझे वडील स्वत: एक क्रिकेटपटू होते आणि त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटत असणार. त्यांची शिकवण, खेळाप्रती प्रेम आणि त्यांच्या भावना तुझ्या माध्यमातून जिवंत आहेत. तसेच या युवा खेळाडूसोबत आम्ही नेहमी उभे राहू, असेही जयसूर्याने म्हटले.

‘त्या’ पाच षटकारानंतर पित्याला गमावले! श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेवर कोसळला दु:खाचा डोंगर