हिंदुस्थानात मुले दत्तक घेण्याची संख्या वाढतेय! महाराष्ट्र अव्वल स्थानावर

बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची प्रकरणे वाढली असून अनेक जोडपी मुले दत्तक घेण्यासाठी वळत आहेत. हिंदुस्थानात मुले दत्तक घेण्याची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशांतर्गत आणि आंतरदेशीय मिळून तब्बल 4,515 मुलांना नवे पालक मिळाले, देशांतर्गत दत्तक प्रकरणात महाराष्ट्राने सर्वाधिक 790 मुलांना दत्तक दिले. त्यापाठोपाठ तामीळनाडू (438) व पश्चिम बंगाल (297) या राज्यांचा क्रमांक लागतो.

केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (कारा) आकडेवारीनुसार, मुलांना दत्तक घेताना पालक अनेकदा लहान व निरोगी मुलांना प्राधान्य देतात. त्यातही मुलींना जास्त पसंती मिळते. यंदा झालेल्या दत्तक प्रकरणांपैकी तब्बल 56 टक्के मुली दत्तक घेतल्या गेल्या. मुलींविषयी दत्तक घेऊ पाहणाऱया पालकांमध्ये एक विशेष ममत्व दिसून येते तसेच मुली अधिक सांभाळण्यास सोप्या जातील, असाही एक समज पालकांमध्ये असल्याने मुलींना जास्त मागणी असते. आंतरदेशीय दत्तक प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून 59 मुलांना विदेशातील पालक मिळाले. पंजाब 41 व पश्चिम बंगाल 31 या राज्यांचा त्यामागे क्रमांक लागतो. तर देशभरात सध्या 36 हजारपेक्षा जास्त जोडपी दत्तक प्रक्रियेची वाट पाहत आहेत. 2,749 मुले दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 1,808 मुले ही विशेष गरजा असलेली आहेत. त्यामुळे अशा मुलांना दत्तक घेण्याची इच्छा फार कमी पालक दर्शवतात.