
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजूरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीही सुरू केली आहे. पण निवडणूक आयोग याबाबत माहिती देण्यास टाळटाळ करत आहे. त्यामुळे यात काही गौडबंगाल आहे अशी शंका उपस्थित होत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकाच्या आलंद आणि राजूरा मतदारसंघात कशी मतांची चोरी झाली होती हे सांगितले होते. तसेच कर्नाटक सीआयडीने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, पण त्यांनी ही माहिती दिलीच नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले. आता राजूरा विधानसभा मतदारसंघाबाबतही हाच प्रकार घडत आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघातून 6 हजार 800 मतदारांची नावं हटवण्यात आली होती. या प्रकरणी ऑक्टोबर 2024 मध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांना याचा तपासही सुरू केला. पण राज्य निवडणूक आयोग यावर माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे.
लोकसत्ता या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन अर्जाचे तांत्रिक तपशील, संबंधित लोकांचे मोबाईल नंबर, आयपी अॅड्रेस आणि सर्व्हर लॉग यांची माहिती मागितली आहे. पण आयोगाने याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना दिलेली नाही. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती न दिल्याने संथ गतीने याचा तपास सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाला याबाबत पुन्हा पत्र पाठल्याचे पोलिसांनी सांगितले.