
मणिपूरच्या इम्फाळ येथील रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेची सीजेरीयेन पद्धतीने प्रसुती करत असताना त्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या घरच्यांचा राग अनावर झाला आणि महिलेच्या कुटुंबाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत निषेध व्यक्त केला. तसेच रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरवरही हल्ला केला.
चिंगशुबम ओंगबी मंजू अशी त्या मृत गर्भवती महिलेची ओळख आहे. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिचा कुटुंबात संतापाची लाट उसळली. रागाच्या भरात कुटुंबाच्या काही सदस्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या रुमसह इतर मालमत्तेची तोडफोड केली. एवढेच नाही तर डॉ. प्रीतमकुमार सिंग यांच्यावर हल्ला केला.
पीडितेच्या कुटुंबियांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टरांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान आता त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी संघटना (TAMOA) ने एक निवेदन जारी केले आहे. TAMOA ने सांगितले की, जोपर्यंत दोषींना अटक होत नाही तोपर्यंत सर्व बाह्यरुग्ण, आपत्कालीन आणि नियमित सेवा पूर्णपणे बंद केल्या जातील. आधीच दाखल झालेल्या रुग्णांची तपासणी केली जाईल. तसेच त्यांनी महिलेच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले. मात्र कुटुंबाचे असे वर्तन चुकीचे आहे. त्यांनी दर रुग्णालयाची तोडफोड केली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे थोडे धैर्य राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.