
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना वरळीच्या शासकीय रेस्टहाऊसमधील चादरी, उशांची कव्हर, पडदे, टॉवेल, नॅपकिन धुण्याच्या नावाखाली शासकीय तिजोरीची 20 लाख रुपयांची धुलाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रेस्टहाऊसच्या नूतनीकरणात या सर्व गोष्टी नव्याने विकत घेण्यात आल्या, पण तरीही उद्घाटनापूर्वी चादरी, पडदे लॉण्ड्रीत धुवायला टाकण्याचा घाट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वरळीतील जयंत पालकर मार्गावर विसावा हे शासकीय विश्रामगृह आहे. 22 खोल्या असलेल्या या विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्य मुंबई विभागाकडून केले जाते. या विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम मार्च 2022 मध्ये हाती घेण्यात आले. एन. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने 15 महिन्यांत नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या नूतनीकृत विसावा विश्रामगृहाचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 1 जून 2023 रोजी करण्यात आले.
मात्र रेस्टहाऊसच्या उद्घाटनापूर्वी आणि प्रत्यक्ष नूतनीकरणाचे काम सुरू असताना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल आणि मे 2023 च्या दरम्यान विश्रामगृहातील बेडशीट, उशीचे कव्हर, चादर, पडदे, नॅपकिन धुण्यासाठी लॉण्ड्रीत टाकले. त्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षात किरकोळ दुरुस्तीअंतर्गत विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील पाच कक्षांतील बेडशीट, उशीचे कव्हर, चादर, पडदे, नॅपकिन यांच्या धुलाईसाठी दहा लाख रुपयांचा तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील एकूण दहा कक्षांतील दैनंदिन कपडे धुलाईसाठी 9 लाख 98 हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला गेला. या या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांनी 8 मे 2023 आणि 9 मे 2023 अशा दोन वेगवेगळय़ा तारखांना मान्यता दिली.
नूतनीकरणानंतर संपूर्ण रेस्टहाऊस तयार झाले. यावेळी खोल्यांमधील खिडक्यांना नवीन पडदे बसवण्यात आले, पण उद्घाटनापूर्वी या रेस्टहाऊसमधील चादरी पडदे लॉण्ड्रीत धुवायला टाकून 20 लाखांचे बिल करण्यात आले. रेस्टहाऊससाठी सर्व वस्तू नव्याने खरेदी केल्या, मग जुने पडदे, चादरी लॉण्ड्रीत धुवायला का टाकले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आह