आधी पूल बांधा, मगच रस्ता बंद करा ! पूर्वेकडे जाण्यास मोठा फेरा मारावा लागणार; अंबरनाथच्या रेल्वे ट्रॅकशेजारील भिंतीचे काम करण्यास विरोध

अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन येथे रेल्वेने सुरू केलेले संरक्षण भिंतीचे काम वादात सापडले आहे. नागरिकांनी विरोध करत हे काम थांबवले. संरक्षक भिंतीमुळे अंबरनाथ पश्चिमहून पूर्वेकडे जाणारा रस्ता बंद होणार आहे. पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागणार आहे. त्यामुळे आधी पूर्व-पश्चिम पादचारी पूल बांधा, मगच भिंत बांधून रस्ता बंद करा अशी नागरिकांची मागणी आहे.

अंबरनाथच्या पूर्व भागात हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीसाठी दररोज हजारो कामगार येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो कामगार रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. कल्याण-बदलापूर मार्गावरील मोरीवली नाका ते पूर्वेकडील बी केबिन निसर्ग ग्रीन या ठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या ट्रॅक ओलांडूनच नागरिक ये-जा करतात. रेल्वेच्या विकास योजनेंतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागणार आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतल्यामुळे रेल्वे प्रशासनाला माघार घ्यावी लागली.

पाच किलोमीटरचा फेरा
अंबरनाथ पश्चिमेतील मोरीवली येथील औद्योगिक वसाहत आणि पूर्वेतील निसर्ग ग्रीन गृहसंकुल हा प्रवास रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत होतो. मात्र रस्ते मार्गाने या प्रवासासाठी 25 ते 30 मिनिटे लागतात, तर हे अंतर तब्बल पाच किलोमीटर इतके आहे. हा मार्ग ओलांडण्यासाठी वाहनाने हुतात्मा चौकाजवळील उड्डाणपूल किंवा फॉरेस्ट नाक्याजवळील उड्डाणपुलावरून जावे लागेल. यासाठी रिक्षाचा 80 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.