
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेलं पिकं धुवून निघालं. मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मांजरा नदीपात्रात तब्बल 55,113.30 क्सुसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज (23 सप्टेंबर 2025) सकाळी 9.30 वाजता गेट क्रमांक 8,17,12,13,11 व 14 (हे 6 गेट) 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1, 2, 3, 4, 5 व 6) 3.00 मीटरने आणि 6 वक्रद्वारे (क्र. 8,17,12,13,11 व 14) 0.25 मीटरने चालू असून मांजरा नदी पात्रात 55,113.30 क्युसेक्स (1560.84क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.
निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग वाढवला
निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने सकाळी ठीक 10:30 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 02 द्वारे हे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढ करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 10 वक्रद्वारे 50 सेंटिमीटरने व 2 वक्रद्वारे 1 मीटरने चालू असून एकूण 26,279 क्यूसेक्स (744.17) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.