Pandharpur News – नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला पारंपरिक पोषाख व अलंकार परिधान

घटस्थापनेनंतर आजपासून श्री रूक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाला समितीच्या वतीने सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथा-परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रूक्मिणी यांना पारंपरिक पोषाख व अलंकार परिधान करण्यात आले. मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार,रूक्मिणी मातेस लमाणी पोषाख परिधान करण्यात आला आहे.

रूक्मिणी मातेस परिधान केलेले अलंकार –

चिंचपेटी, तनमई मोठा, भोर, झेला, ठुशी, लहान सरी, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, लमाणी नथ, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, पुतळ्यांच्या माळा, तारा मंडळ, कर्णफुले जोड आदी अलंकार.

श्री विठ्ठलास परिधान केलेले अलंकार –

सोने मुकुट, बालाजी नाम, कौस्तुक मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच, मस्त्य जोड, तोडे जोड, चंद्रहार (पंधरा पदरी), अष्टपैलू मण्याची कठी, पाच पदरी लॉकेट, जवेची माळ सात पदरी, पदकासह लॉकेट इत्यादी पारंपारिक अलंकार.

इतर देवींचे अलंकार व पोषाख – 

सत्यभामा देवी – नक्षीटोप, जप्याच्या व जवेच्या माळा, सरी

राधिका माता – सिद्धेश्वर टोप, हायकोल, जवेची माळ

याशिवाय पंढरपूर शहर व परिसरातील मंदिर समितीच्या अखत्यारीतील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता इत्यादी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख परिधान करण्यात आले आहेत.

सदरचे अलंकार व पोषाखांचे दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी सांगितले.