
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाटणाऱया महायुती सरकारने संकटात असलेल्या मराठवाड्यासाठी मात्र मदतीचा हात आखडता घेतला आहे. ऑगस्टपासून ते आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल 32 लाख हेक्टरवरील पिकांचा अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे. हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या अपेक्षेने पाहत असताना सरकारने मात्र त्याच्या हाती कवड्याच दिल्या आहेत. हिंगोली, बीड, लातूर, धाराशीव या चार जिल्ह्यांसाठी 721 कोटी रुपये, तर नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी रुपये मदत देऊन फडणवीस सरकारने पूरग्रस्तांची क्रूर थट्टाच केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्याला तर फुटकी कवडीही देण्यात आलेली नाही.
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टी झाली आहे. मे महिन्यात पावसाने धुमशान घातले. त्यानंतर जून, जुलैमध्ये जेमतेम हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने थैमान घातले. सप्टेंबरमध्ये तर अतिवृष्टीचा कहरच झाला. तुफान पावसामुळे मराठवाडय़ाच्या आठ जिल्ह्यातील तब्बल 32 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचा चिखल झाला. तीन तीन आठवडे होऊनही शेतातील पाण्याचा निचरा झालेला नाही. उभा ऊस आडवा झाला. काढणीला आलेल्या मोसंब्या, डाळिंब, पपई, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. शेतकऱयांचा आधार असलेल्या सोयाबीन, कापूस, मक्याची माती झाली. सरकार आपल्यालाही भरघोस मदत देईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. परंतु फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हाती करवंटीच दिली. हिंगोली, बीड, लातूर, धाराशीव जिल्हय़ांत 8.48 लाख हेक्टरवर झालेल्या नुकसानीपोटी 721.97 कोटी रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
अशी मिळणार मदत…
जिरायतसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये, तर बागायतीसाठी हेक्टरी 17 हजार रुपये आणि फळपिकांसाठी हेक्टरी 22.5 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. सरकारने मदत देताना हेक्टरी न देता एकरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. कारण हेक्टरी विचार केला तर अल्पभूधारक शेतकऱयांना यातून अतिशय किरकोळ मदत होणार आहे.
माढा, मोहोळ, करमाळय़ात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर
‘एनडीआरएफ’चे पथक दाखल
सोलापूर जिह्यात 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच अतिवृष्टी आणि धाराशीव आणि जिह्यांमधून होणारा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे माढा, मोहोळ, करमाळा, कुर्डुवाडी तालुक्यात हाहाकार उडाला असून, 40 हून गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, सोलापूर जिह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील शाळांना तातडीने सुट्टी देण्यात आली आहे. एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.
सोलापूर जिह्यातील पूरस्थितीचे चित्र अक्षरशः हाताबाहेर असून, कर्नाटकात जाणारे आणि पुणे-सोलापूर, सोलापूर-धुळे महामार्ग प्रभावित झाले आहेत. अतिवृष्टी आणि पाण्याचा विसर्ग यामुळे सीना नदीने रौद्ररूप धारण करत शेती, गावे, वाडय़ा वस्त्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. माढा, करमाळा, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन हजारांहून ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.