
आलिशान गाड्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत म्हणून महायुती सरकारचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मराठवाड्यातून पाहणी न करताच माघारी फिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.
गिरीश महाजन यांनी मराठवाड्यातील बेलगाव (पिंपळगाव) येथे भेट दिली होती. पिके उद्ध्वस्त झालेले शेतकरी त्यांना प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करा असा आग्रह करत होते. पण बांधावर गाड्या जात नाहीत असे कारण सांगून महाजन आल्या पावली माघारी गेले. मदत करता येत नसेल तर शेतकऱयांची थट्टा तरी करू नका, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. एक्सवर एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.
जिथून महाजन माघारी फिरले तिथेच हाकेच्या अंतरावर विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यातील 35-40 जनावरं दगावून गोठा उद्ध्वस्त झाला. दातखिळे कुटुंबावरील संकटाचं भान तरी मंत्री महाजन यांनी ठेवायला हवं होतं, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
संकटमोचक गायब –वडेट्टीवार
संकटमोचक म्हणून राज्यात स्वतःला मिरवणारे, सत्तेसाठी विविध पक्षातील नेते पळवणारे गिरीश महाजन अतिवृष्टीने बळीराजा संकटात असताना पळ काढत आहेत, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.