
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 25 सप्टेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेली असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्याची दैना उडाली आहे. शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून शेतातील माती, घरं पशुधन वाहून गेले आहे. याच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
मराठवाड्यात पूर परिस्थिती गंभीर आहे
६० लाख एकर वरील पीक मातीसह वाहून गेले ;अनेक पिढ्या त्यामुळे शेती करू शकत नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार) पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत
३६ लाख शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावाच लागेल
@narendramodi pic.twitter.com/eoOOpZaXlF— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2025
राऊत पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील साधारण 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांची घरं, पशुधन नष्ट झाले आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना महापुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पिक, पशुधन, घरं-दारं वाहून गेली आणि 9 लाख कोटींचे कर्ज असलेल्या सरकारने 2,215 रुपये कागदावर मंजूर केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी केली आहे. ती मिळाल्याशिवाय मराठवाडा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण सध्याच्या परिस्थितीत तग धरणार नाही. त्यामुळे 10 हजार कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पुरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली, असेही राऊत म्हणाले.
सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. याआधीचा दुष्काळ, अवकाळी पाऊस या संदर्भात दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणताही पैसा उरलेला नाही. ज्या सरकारच्या डोक्यावर 9 ते 10 लाख कोटींचे कर्ज आहे ते सरकार शेतकऱ्यांना मदत कुठून करणार? म्हणून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, तात्काळ 10 हजार कोटींची मदत द्या, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा खडा सवाल
मराठवाड्यात आता आपल्या सही, शिक्क्यांच्या, चिन्हाच्या पिशव्यातून मदत वाटण्याचे काम सुरू आहे. म्हणजे किती निर्लज्जपणा. लोक मरताहेत आणि मुडद्यांचे राजकारण तुम्ही करताय. भगव्या पिशव्या, त्याच्यावर तुमचे फोटो, तुमच्या पक्षाचे चिन्ह… हे राजकारण करण्याचे आणि प्रचार करण्याचे कोणते निर्लज्ज तंत्र अवलंबलेले आहे? असा सवाल राऊत यांनी केला.
… तर स्वत:च्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा
एका बाजुला भाजपचा वेगळा कारभार, दुसऱ्या बाजुला मिंधे गटाचे वेगळेच सुरू आहे. त्यानंतर अजित पवार गटही येईल. म्हणजे इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे. लोक मरताहेत, आक्रोश चालला आहे. लोक वाहून जााताहेत. म्हणजे अशा प्रकारे निर्दयीपणे काम करणारे सरकार या राज्यामध्ये आहे. किमान माणुसकी नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. पैशाची एवढी मस्ती असेल तर स्वत:च्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. ठेकेदाराकडून लुटलेले, शक्तीपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोकळा करा आणि आबालवृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिलांना मदत करा, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
ही प्रचाराची वेळ नाही
हा साधा आघात नाही. पिकं, शेती, जमीन, माती सर्वच वाहून गेले आहे. ज्या मातीत पिकं काढली जातात ती मातीच उरलेली नाही. त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांचे नुकसान आहे. मराठवाडा शेतीच्या दृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. हे सरकारच्या लक्षात आलंय का? जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटताहेत किंवा प्रचार करताहेत त्यांना हे कळतंय का किती मोठे गंभीर नुकसान झालेले आहे? ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही हे त्यांना सगळ्यांना समजायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी खडसावले.