ससूनमध्ये उपचारांअभावी तरुणाचा तडफडून मृत्यू

डॉक्टर म्हणजे रुग्णासाठी देवच ! पण ससूनमधील हा ‘देव’च एका तरुणासाठी ‘राक्षस’ बनला आहे. ससूनमध्ये उपचारांसाठी एक आदिवासी तरुण दाखल झाला. मात्र, कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे तो दोन तास रुग्णालयात तडफडत पडला होता. तरीही त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अखेर उपचारांअभावी तडफडत पडलेल्या त्या आदिवासी कातकरी समाजातील तरुणाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ससूनमधील या निर्दयी प्रकारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

अनिल वाघमारे असे आदिवासी कातकरी समाजातील मृत तरुणाचे नाव आहे. उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी किंवा रुग्णालयातील अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखवले नाही. उपचारांअभावी तो तरुण दोन तास तडफडत होता. डॉक्टरांनी उपचार न केल्यानेच अनिलचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात असून, रुग्णाल य प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी ससून प्रशासनाशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.