लडाख पेटलं! रोजगार आणि लोकशाहीसाठी जेन झी क्रांती, भाजपचं कार्यालय जाळलं; सीआरपीएफचे वाहन पेटवले!!

नेपाळपाठोपाठ हिंदुस्थानातही सत्ताधाऱयांच्या विरोधात उद्रेक झाला. लडाखमध्ये याची पहिली ठिणगी पडली. स्वतंत्र राज्याच्या दर्जासाठी गेल्या काही आठवडय़ांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज भडका उडाला. रोजगार आणि लोकशाहीसाठी लडाखची राजधानी लेहमध्ये ‘जेन झी’ तरुणाई रस्त्यावर उतरली. या तरुणांनी केंद्रातील सत्ताधाऱयांना लक्ष्य करत लेहमधील भाजपचे कार्यालय जाळून टाकले. सीआरपीएफच्या वाहनालाही आग लावण्यात आली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रूधुराचा मारा केला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत 4 जणांचा मृत्यू झाला, तर 70 जखमी झाले.

स्वतंत्र राज्याच्या दर्जासह विविध मागण्यांसाठी केंद्रशासित लडाखमधील पर्यावरणवादी सोनम वांगचुक व लेह ऍपेक्स बॉडी (लॅब) या संघटनेचे नेते उपोषणाला बसले आहेत. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता होती. या अस्वस्थतेतून ‘लॅब’ने आंदोलनाची हाक दिली. त्यास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतप्त तरुणांनी भाजप कार्यालय, पोलिसांना लक्ष्य करत तुफान दगडफेक व जाळपोळ केली.

हिंसक आंदोलनामुळे व्यथित झालेल्या वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले. ‘शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलन हिंसाचारामुळे झाकोळले गेले आहे. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला पडला आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असे वांगचुक म्हणाले. मात्र, ‘लॅब’च्या नेत्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागण्या काय…

– लडाख केंद्रशासित प्रदेश असणे पुरेसे नाही. त्यातून स्वयं-शासनाचा व सुरक्षेचा अधिकार मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्याचा दर्जा हवा.
– आदिवासी राज्य ही ओळख कायम राहावी म्हणून लडाखचा राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टात समावेश करा.
– बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन करा.
– लडाखमधून सध्या केवळ एक खासदार निवडून जातो. आमचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी लोकसभेच्या किमान दोन जागा येथे असाव्यात.

16 दिवस उपाशी ठेवल्यानंतर बैठक

लडाखला राज्याचा दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने 6 ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. लोकांना 16 दिवस उपाशी ठेवून बैठक बोलावली आहे. ही बैठक तातडीने व्हावी अशी आंदोलकांची मागणी आहे.

हा तरुणांचा उद्रेक

‘लडाखचे तरुण पाच वर्षांपासून बेरोजगार आहेत. एकालाही नोकरी मिळालेली नाही. वेगवेगळी कारणं देऊन त्यांना नोकरीपासून दूर ठेवलं जातंय. लडाखकडं लक्षही दिलं जात नाही. न्याय मागावं असं कोणतंही लोकशाही व्यासपीठ इथं अस्तित्वात नाही. त्यातून तरुणांमध्ये रोष आहे, त्या अस्वस्थतेतून तरुण पिढी रस्त्यावर आली. ही एक प्रकारची जेन झी क्रांती आहे, मात्र तरुणांनी शांतता राखावी. नाहीतर गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न फोल ठरतील.’ असे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी सांगितले.