
कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. बांधावर जाऊन शेतकऱयांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळय़ा मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान 30 ते 40 हजारांची मदत घोषित करावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये पुढील सूचना मांडल्या आहेत.
– गेल्या काही वर्षांतल्या बेफाम उधळपट्टीने राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी यावेळी मदत करताना सरकारने हात आखडता घेऊ नये. पेंद्राकडून मदतीचे पॅकेज मिळवावे. त्यासाठी दिल्लीकडे पाठपुरावा करावा.
– एकाही मुलाचे शिक्षण बंद होणार नाही यासाठी तत्काळ कृती करा.
– अशा आपत्तीनंतर रोगराई वाढते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य पेंद्रांपर्यंत सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे पहावे.
– अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी बँकांचा तगादा लागतो. सरकारने बँकांना योग्य ती समज आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.