Beed news – कुंडलिका नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 36 तासानंतर सापडला

वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील कुंडलिका नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अक्षय बाबासाहेब जाधव (वय – 24) तरूणाचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर सापडला आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला अक्षयचा मृतदेह दुकडेगावच्या बंधार्‍याच्या पिल्लरला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यावर आभाळ कोसळले असून बीड जिल्ह्यात पुराने थैमान घातले. गेल्या 35 वर्षात पहिल्यांदाच कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीला आलेल्या पुरात कुप्पा येथील अक्षय जाधव हा वाहून गेला होता. मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दिवसभर शोध मोहिम सुरू होती. मात्र बेपत्ता झालेल्या अक्षयचा ठावठिकाणा लागत नव्हता.

गुरुवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले अन् तब्बल 36 तासानंतर कुंडलिका नदीत असलेल्या दुकडेगाव येथील बंधार्‍याच्या पिल्लरला अडकलेला अक्षयचा मृतदेह सापडला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.