ठसा – डॉ. हेमा साने

<<< मेधा पालकर >>>

वनस्पती क्षेत्राचा एनसायक्लोपीडिया अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे नुकतेच निधन झाले. निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. मध्यवर्ती पुण्यात, बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले. हेमा साने यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एससी., पीएच.डी. संपादन केली. भारतीय विद्या शास्त्रातल्या एम.ए., एम.फिलपर्यंत शिक्षण घेतले. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.

पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या राहत होत्या. त्यांच्या घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे नव्हती. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. वाड्यातील विहिरीतील पाण्याचाच त्या वापर करत होत्या. त्यांनी दूरध्वनी वापरला नाही. रात्री समई लावून बेलाच्या झाडाखाली लेखन-वाचन करणाऱ्या साने थेट निसर्गाकडून ज्ञान घेऊन कागदावर उतरवत राहिल्या. त्यांचं वनस्पती शास्त्रावरचं लिखाण वाचलं तरी त्यांच्या या बहुश्रुत व्यासंगाचा अंदाज येतो. पर्यावरण, निसर्ग संवर्धन क्षेत्रांतील विविध नामवंत संस्थांकडून त्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.