जाऊ शब्दांच्या गावा – बोलण्यात गोम आहे

<<< साधना गोरे >>>

एखाद्याच्या बोलण्याचा संदर्भ लागला नाही किंवा एखाद्याच्या सांगण्यात काही त्रुटी असेल तर ‘त्याच्या बोलण्यात काहीतरी गोम आहे’ असं म्हटलं जातं. या शब्दप्रयोगाचा आणि ‘गोम’ नावाच्या सरपटणाऱ्या प्राण्याचा काही संबंध आहे का? अन् संबंध असला तर अनेक पाय असलेली, सरपटणारी गोम बोलण्यात कशी जाईल? असा प्रश्न मनात आला असेल ना! तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच हा लेख आहे.

गोम हा सरपटणारा प्राणी मुंग्या, झुरळं याप्रमाणे सहसा कुठंही दिसत नाही, तर गोम दगडाखाली किंवा इतर कशाच्या आडोशाने दडून वावरते. गोमेच्या काही जाती विषारी असतात. विशेषतः लहान मुलांना गोम चावली तर त्यांचा मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असतो. अशी ही गोम किंवा इतर कीटक कानात जायची भीती मनुष्याला वाटली असणार. त्यामुळे पूर्वी अंगणात झोपताना घरातले लहानथोर कानासहित डोकं बांधून झोपत. आजही गावाकडे जुने लोक डोकं बांधल्याशिवाय झोपत नाहीत.

तर सांगायचा मुद्दा असा की, हा ‘गोम’ शब्द मूळ कोणत्या भाषेतला ते नक्की सांगता येत नाही, पण कृ. पां. कुलकर्णी यांनी आपल्या व्युत्पत्ती कोशात हा शब्द प्राकृतमधून आल्याचं म्हटलं आहे. प्राकृतमध्ये ‘गोह्मी’ असा शब्द आहे. त्यावरून ‘गोमी’, ‘गोम’ असा तो मराठीत आला, असं कुलकर्णी म्हणतात. कानडीमध्ये गोमेला उद्देशून ‘गोमू’ शब्द आहे असं कुलकर्णींनी म्हटलं आहे, पण पुंडलिक कातगडे यांच्या ‘कन्नड – मराठी कोशा’त हा शब्द आढळत नाही.

कानात जाणारा कीटक म्हणून संस्कृतमध्ये गोमेला ‘कर्णकीट’ किंवा ‘कर्णकिटी’ असा शब्द आहे. गोमेच्या अनेक पायांवरून संस्कृतमध्ये तिला ‘शतपदी’ असंही म्हटलं गेलं आहे. या संस्कृत शब्दावरून हिंदी आणि पंजाबीमध्ये ‘कनखजुरा’, गुजरातीमध्ये ‘कनखजुरो’, नेपाळीमध्ये ‘कनसुत्लो’ असे शब्द आहेत.

तर असा हा साधारण मराठीतच दिसणारा ‘गोम’ शब्द वैगुण्य, दोष या अर्थाने कसा रूढ झाला असेल? याविषयी कृ. पां. कुलकर्णी आणि दाते – कर्वे यांच्याबरोबरच इतरही काही शब्दकोशकारांनी म्हटलं आहे की, घोड्याच्या पाठीवर गोमेच्या आकाराची केसांची वळी असते. म्हणजे घोड्याच्या मानेवरील उभ्या केसांमुळे तो भाग गोमेसारखा दिसतो. या वळीच्या केसांचा रोख घोड्याच्या डोक्याच्या दिशेने असेल तर ते शुभ मानलं जातं, पण वळीच्या केसांचा रोख शेपटाच्या दिशेने असेल तर ते अशुभ मानलं जातं. एक प्रकारे तो घोड्याचा दोष समजला जातो. म्हणजे मुळात हा घोड्याचा दोष, जो कालांतराने चुकीच्या बोलण्याला लागू झाला.

गोमीच्या अनेक पायांवरून काही विनोद आपण ऐकले असतील. तसेच त्यावरून काही म्हणीही आहेत. उदा. ‘गोमीस पाय बहुत, एक पाय मोडला तर उणे पडत नाही’ किंवा ‘गोमीचे दोन पाय कमी झाले म्हणून ती लंगडी होत नाही’. याचा अर्थ गोमीला पुष्कळ पाय असतात व त्यातील एखादा तुटला तरी तिला चालण्याची अडचण पडत नाही. त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याजवळ मनुष्यबळ पुष्कळ असेल तर त्यातील काही कमी पडले तरी त्याचे कार्य अडत नाही किंवा एखाद्यास पुष्कळ युक्त्या माहीत असतील तर त्यातील एखाददुसरी फसली तरी त्याचे अडत नाही.

‘गोमेची विद्या गोम जाणे, भुरगी बापडी काय जाणत?’ अशीही एक म्हण आहे. म्हणजे गुप्त गोष्ट ज्याची तेच ओळखतात. इतरांना त्यातले मर्म ते काय समजणार?

पूर्वी ‘गोमा’ हे पुरुषाचं नाव असे. शिवाय ‘कुणीतरी उपटसुंभ’ किंवा ‘कुणीही येरागबाळा’ या अर्थाने ‘सोम्या गोम्या’ किंवा ‘गोमा गणेश’ असंही म्हटलं जातं. याविषयी काही शब्दकोशकारांनी पुढील गोष्ट सांगितली आहे – एका बादशहाची कारकीर्द फार अव्यवस्थित होती. त्याचा फायदा गोमा नावाच्या धूर्त मनुष्याने घेतला. तो गावच्या पितळी दरवाजाच्या वेशीजवळ बसून प्रत्येक मालावर बादशहाच्या नावाने ठरावीक जकात घेत असे. लोकही बादशाही कायदा असेल म्हणून मुकाट्याने जकात देत. पावतीवर ‘गोमा गणेश पितळी दरवाजा’ असा शिक्का तो मारी. पुढे ही अजब घटना बादशहाच्या नजरेस आली; पण त्याला ती बंद करता येईना. त्याने या ‘गोमा गणेशा’च्या हुशारीबद्दल फार तारीफ केली व जकात चालू ठेवली. यावरून कोणीतरी ‘क्ष’ माणूस या अर्थाने ‘गोमा गणेश’ हा शब्द रूढ झाला. कालांतराने याच अर्थाने ‘गोमा’, ‘गोमाजी’, ‘सोमाजी’, ‘तिमाजी’ असंही म्हटलं जाऊ लागलं.

[email protected]