
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पुरामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. राज्यावर ओढवलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या परिस्थितीतही ओला दुष्काळ जाहीर न करता एसडीआरएफच्या निकषानुसार आपद्ग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये, जनावरांसाठी 37 हजार रुपये, पुरामुळे बाधित जमिनांसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी मदतवाटपास सुरुवातही झाली आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेकडो नागरिक आणि जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अनेकांची घरे वाहून गेली, हजारो घरांची पडझड झाली आहे. शेती पिकाच्या नुकसानीबरोबर पुराचे पाणी शिरून जमिनीचे नुकसान झाले आहे. राज्यावर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटात ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करत नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेले निकष आणि दरानुसार आपद्ग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यभर नुकसान पाहणी दौरे सुरू असून पंचनामे सुरू आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे थेट अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱयांकडे निधी शिल्लक नसेल तरी उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– पुरामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. तर खरडून गेलेल्या दुरुस्त न होणाऱया जमिनींसाठी कमाल 47,000 रुपये प्रति हेक्टर आणि कमीत कमी किमान 5,000 रुपये मदत मिळेल.
– कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे. कुक्कुटपालन करणाऱया शेतकऱयांसाठी प्रति कोंबडी 100 रुपये या दराने एका कुटुंबाला जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत
नैसर्गिक आपत्तीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल. 60 टक्के अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार आणि 40 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’मधून मदत द्या; फडणवीसांचे शहांना पत्र
शेतकऱयांना ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देत केली आहे. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱयांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत केंद्राला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, फडणवीस हे शुक्रवारी दिल्लीत जाणार आहेत.
म्हैस, गाय दगावल्यास 37 हजार 500 रुपये
म्हैस, गाय दगावल्यास 37 हजार 500, मेंढी-शेळी 4 हजारांची मदत प्रति जनावर देण्यात येईल. ओढ काम करणाऱया बैल, घोडा यासाठी 32 हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी 20 हजारांची मदत देणार. मोठय़ा जनावरांची मर्यादा तीन तर छोटय़ा जनावरांची मर्यादा 30 असेल.
पूर्णतः पडलेल्या घरांसाठी 1 लाख 20 हजार
पूर्णतः पडझड झालेल्या घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अंशतः पडलेल्या कच्च्या घरांसाठी 4 हजार, पक्क्या घरांसाठी 6 हजार 500 तर नष्ट झालेल्या झोपडीसाठी 8 हजार मदत दिली जाईल. याशिवाय जनावरांच्या गोठय़ासाठी 3 हजार देणार.