
मुंबईतील कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गुरुवारी कारला आग लागली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दक्षिणेकडील टनेलमध्ये सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कारला आग लागली. पांढऱ्या कारमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. त्याचा धूर टनेलमध्ये पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. त्यानंतर कोस्टल रोड टनेलमधून उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती मुंबई ट्रफिक पोलिसांनी सोशल मीडियावर दिली. वाहतूक हाजीअली आणि वरळी कनेक्टरकडे वळवण्यात आली. अर्धा तास वाहतूक ठप्प पडली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.