
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आमचा कट्टर विरोध आहे, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांना घरचा आहेर दिला. ‘राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचे दुमत असण्याचे कारण नाही. जे कोणी यातून राजकारण करतील, त्यांना आवर घालण्याची गरज आहे’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावर भुजबळ यांना येवल्यात प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, ‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ‘सारथी’मधून मराठा समाजाला मोठी मदत झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे नोकरी-धंद्यासाठी मराठा समाजाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळाले. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.