हात बरबटलेल्या मंत्री, आमदार, खासदारांचे बुरखे फाडा! गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर

सरकारमधील काही मंत्री आणि खासदार, आमदारांचे हात बरबटलेले आहेत, त्यांना सोडू नका, त्यांचे बुरखे फाडा, असा घरचा आहेर वनमंत्री गणेश नाईक यांनी महायुती सरकारला दिला. विक्रमगड येथे झालेल्या जनता दरबारात नाईक यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींवरच थेट तोफ डागली. त्यांचा रोख नेमका कोणावर आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आपला चौथा जनता दरबार विक्रमगड येथे घेतला. यावेळी तक्रारदारांशी संवाद साधताना ते म्हणाले, अधिकारीवर्गाकडे लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीर कामांची शिफारस केली जाते. अशी शिफारस झाल्यावर त्यावर कागदोपत्री पूर्तता करण्याचा शेरा करून हे प्रकरण पुन्हा कनिष्ठ पातळीवर पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आले पाहिजे. अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवले गेले पाहिजे. ज्या मंत्री, आमदार आणि खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत त्यांचा कारनामा बाहेर काढला गेला पाहिजे. त्यांच्या कारनाम्यांचा बुरखा जनतेने फाडला पाहिजे. लोकाभिमुख कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असेही गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान नाईक यांनी केलेल्या या विधानावर पत्रकारांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता नाईक काय बोलले हे आपल्याला माहीतच नाही. त्यांच्याशी चर्चा करून मग तुमच्याशी बोलतो, अशी सारवासारव बावनकुळे यांनी केली.

ठाण्यात माझ्या रेंजचा एकही नेता नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात विस्तव जात नसल्याचे त्यांच्या अनेक वक्तव्यावरून समोर आले आहे. नवी मुंबईची प्रभाग रचना, १४ गावांचा समावेश, नवी मुंबईतील भूखंडांचे ओरपलेले श्रीखंड यावरून नाईक यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आजच्या भाषणात त्यांनी आपल्याला खुर्ची, सत्ता, पैसा आणि पॉवरचा मोह नाही असे सांगतानाच ठाणे जिल्ह्यात आपल्या रेंजचा एकही नेता नाही. कोणताही नेता आपली बरोबरी करू शकत नाही, असाही टोला एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.