बाप रे…! एका व्यक्तीच्या पोटात आढळले 29 चमचे, 19 ब्रश आणि 2 पेन; डॉक्टरही चक्रावले

उत्तर प्रदेशातील हापूर येथून एक चक्रावणारी घटना उघड आली आहे. येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 50 गोष्टी काढल्या आहेत. यामध्ये 29 चमचे, 19 टूथब्रश आणि 2 पेन यांचा समावेश आहे. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटातील इतक्या गोष्टी पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. सध्या या बातमीची प्रचंड चर्चा आहे.

बुलंदशहरमध्ये राहणारा सचिन अवघ्या 40 व्या वर्षात नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात दाखल केले होते. आपल्या कुटुंबासोबत राहण्याची सवय असलेल्या सचिनला एकट राहणं कठीण जात होतं. त्यामुळे त्याचा स्वभाव आणखी रागीट होत होता. याच रागातून त्याने स्वत: ला त्रास द्यायला सुरुवात केली होती.

सचिनला राग इतका अनावर होऊ लागला की, व्यसनमुक्ती केंद्रातील भांड्यांमध्ये सापडलेले स्टीलचे चमचे, दात घासताना मिळणारे टूथब्रश आणि सेंटरमधील पेन तो गिळायचा. यामुळे सचिनची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली आणि त्याला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे केंद्रातील लोकांनी सचिनच्या कुटुंबीयांना याबाबत कल्पना दिली आणि त्याला हापूरमधील देवनंदानी रुग्णालयात दाखल केले.

सचिनला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती गंभीर  होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्याच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केला, ज्यामध्ये काही संशयास्पद धातूच्या वस्तू आढळल्या.त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने वेळ न घालवता सचिनला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया केली तेव्हा डॉक्टर आणि त्यांचे सहकारी  आश्चर्यचकित झाले. ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी सचिनच्या पोटातून 29 स्टीलचे चमचे, 19 टूथब्रश आणि दोन पेन काढले. याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. सध्या सचिनची तब्येत बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.