
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पुरामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली. त्यास मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक गावांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱयांचे कशा पद्धतीने नुकसान झाले याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांना देत केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी यासाठी एक निवेदनही सादर केले. आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढी मदत आम्हाला करा, अशी विनंती त्यांना केली. या गोष्टीला पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मकता दाखवली आहे. लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. प्रस्ताव आला की, कार्यवाही करू. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करू, असे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
कर्जमाफी वारंवार करता येत नाही
कर्जमाफीचे आश्वासन आम्ही आमच्या घोषणापत्रात दिले आहे. त्याची पूर्तता आम्ही करणार आहोत. ती कधी करायची आणि कशी करायची यासंदर्भात एक समिती तयार झालेली आहे. ती समिती अभ्यास करत आहे. कारण कर्जमाफी वारंवार करता येत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सविस्तर अहवाल केंद्राला देणार
राज्यभरात प्रचंड पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्य सरकार घेत आहे. पूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मदतीसंर्भात सविस्तर अहवाल आपण केंद्र सरकारला देणार आहोत. हे स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही. त्यामुळे ते एकदा तयार झाले की, याची माहिती दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले.