शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात! धाराशीव जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल

राज्यभरात पावसाने थैमान घातले असून मराठवाडय़ातील अनेक गावांत शेतातील पिके, जनावरे, शेतकऱयांची घरं-संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. धाराशीव, बीड आणि सोलापूर आदी जिह्यांतील शेतकऱयांना सर्वाधिक फटका बसलेला असताना धाराशीवचे जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पूरग्रस्तांना धीर देण्याचे सोडून मौजमस्ती करणाऱया अधिकाऱयांच्या या असंवेदनशील कृतीवरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

तुळजापुरात मंदिर संस्थानकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या दोघीही ‘गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा’ या गाण्यावर झिंगाट डान्स करत असल्याचे एका व्हिडीओत दिसत आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री धाराशीव दौऱयावर आले होते. त्याच संध्याकाळी तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थिती लावत गाण्यांवर ठेका धरल्याचे आढळून आले आहे.

सरकार असंवेदनशील, प्रशासन त्याहून अधिक असंवेदनशील – संजय राऊत

सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्याहून वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले आहे. त्यामुळे अधिकारी असे नाचत आहेत, बागडत आहेत. एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर गाणे म्हणत होता म्हणून त्याला निलंबित करण्यात आले. आता धाराशीवच्या या अधिकाऱयांवर सरकार काय कारवाई करणार आहे ते सांगा, असे शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकार आणि प्रशासनाला गांभीर्य नाही – विजय वडेट्टीवार

आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं…धाराशीवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली, आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशीवचे जिल्हाधिकारी नाचत आहेत. यावरून शेतकऱ्यांवरील संकटाचे गांभीर्य या सरकार किंवा प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका करत कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.

कारवाई करण्याचे धाडस दाखवा – कैलास पाटील

पीडित शेतकऱयांचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करून शासनाचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱयांना मदत मिळवूनी देणे हे जिल्हाधिकाऱयांचे काम आहे. अशा आणीबाणीच्या वेळी, अशा अडचणीच्या वेळी दोन प्रमुख अधिकारी असे वर्तन करत असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी या अधिकाऱयांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.