
>> तृप्ती कुलकर्णी
समाजात सत्य आणि वास्तव याचे ठरावीक ठोकताळे मानले जातात. त्याला आव्हान देणारं कथानक अविश्वसनीय वाटलं तरी जेव्हा तो नायक स्वत पुराव्यासकट आपले अनुभव सांगतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. आशुतोष जोशी यांचे ‘जा जरा पूर्वेकडे’ हे पुस्तक वाचताना हा अनुभव येतो. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जेव्हा आयुष्याच्या पायाभूत गोष्टी शोधायच्या असतात, तेव्हा आशुतोषने घेतलेला धाडसी निर्णय आश्चर्यचकित करतो. लंडनमध्ये उत्तम छायाचित्रकार म्हणून नाव कमावत असतानाच तिथली प्रतिष्ठा, पैसा, संधी नाकारून त्याने भारतात परत येऊन समाजातील समस्यांना समजून घेण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा निर्धार केला. शून्य भांडवल, अस्वस्थ सामाजिक परिस्थिती आणि निद्रिस्त समाज असूनही त्याचा प्रवास सुरू झाला.
अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत केलेल्या या 67 दिवसांच्या आणि 1850 किमी पदयात्रेच्या नोंदी या पुस्तकात आहेत. त्यात सर्वांप्रति समानता मानणाऱया वैश्विकदृष्टीच्या एका द्रष्टय़ा युवकाची खंत आहे. त्यामुळे स्वच्छ नजरेतून हे लेखन समजून घ्यायला हवं. काळ बदलला. भौतिकदृष्टय़ा जगणं समृद्ध झालं, पण मानवी सीमारेषांमुळे एकजिनसी संस्कृतीत, देशात अनेक घटक वेगवेगळे निपजले. भौगोलिक, भाषिक, आर्थिक, राजकीय तर काही शैक्षणिकदृष्टय़ा आणि हे वेगळेपण परस्परांना पूरक ठरण्याऐवजी मारक ठरले, किंबहुना तशी मानसिकताच कशी घडली याची छोटी पण प्रत्ययकारी उदाहरणं यात आहेत.
राजकीय अनास्था, समाजाची बेफिकिरी आणि सामान्य माणसांचे मूलभूत संघर्ष यात ठळकपणे दिसतात. ‘तीन स्त्रिया’ या प्रकरणात फक्त पन्नास रुपयांसाठी कर्त्या पुरुषाचा खून, पोलिसांनी मदत नाकारणं आणि समाजाने केलेली उपेक्षा वाचून अस्वस्थ व्हायला होतं. इंटरनेट मोबाईलच्या युगात हॅशटॅग पलीकडचं आयुष्य काय आहे, हे सांगणारे अनेक हृद्य प्रसंग यात आहेत. मग ते पांडुरंग खिलारी शेतकऱयाकडे त्याच्या नुकसानीच्या बातमीसाठी पत्रकाराने मागितलेली पैशांची मागणी असो वा विशालसारख्या कष्टकरी मुलाचे हातभट्टीच्या दारूमुळे होणारे हाल असो. दारूची चटक लागावी म्हणून त्यात मिसळली जाणारी घातक रसायनं, उंदराचे विष याबाबतची बेफिकरी असो. शेतकऱयांच्या, कष्टकऱयांच्या प्रश्नाबद्दल काही ठरावीक गोष्टी सोडल्या तर आपण किती अनभिज्ञ आहोत हे यातून आपल्याला समजतं. तरीही ही फक्त नकारात्मक कहाणी नाही. हलाखीतही लोकांची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, धर्म व जात निरपेक्षता आणि जीवनावरचा विश्वास हेही प्रसंग भावून जातात. ताज हॉटेलचे मालक राजोद्दीन यांची मदत, गावातील धार्मिक सौहार्द, आमटे कुटुंबाची भेट हे प्रसंग वाचताना मानवी मूल्यांची जपणूक दिसून येते. आशुतोषची अबोल सोबत, ट्रॉलीने जनमानसातलं होणारं कुतूहल, त्यातून घडणारा संवाद. तसंच प्रकाश आमटेंना त्यावरून रुग्णांसाठी उपयुक्त साधनाची कल्पना सुचणं हे प्रसंगही छान आहेत. त्याचबरोबर अस्वलाशी झालेल्या सामन्यात आशुतोषचा विचार, तसंच ट्रक्टरवाल्यांच्या जुन्या गाण्यांवर केलेलं निरीक्षण नकळत हसू फुलवतं तो म्हणतो, ट्रक्टर चालकांसाठी काळ एकाच जागी थांबला असावा. या सगळ्यांना जुन्या गाण्यातच काय एवढा रस असतो. ट्रक्टरबरोबर हा रस आपोआपच निर्माण होत असावा की काय… आणि पुढे चालताना तो विचार करतो, कदाचित त्यांनी एखादी वार्षिक बैठक घ्यावी आणि चालू वर्षी कुठल्या काळातील गाणी आपण वाजवावी त्यांची निवड करावी.
पुस्तकाची आणखी वैशिष्टय़े आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीची आकर्षक चित्रं, उत्कृष्ट मांडणी आणि छपाई यामुळे निर्मिती उठावदार झाली आहे. संवादी लेखनशैली, लोकप्रिय व्यक्तींची अवतरणं, आंतरराष्ट्रीय साहित्य-चित्रपटातील संदर्भ त्यामुळे कथन स्थानिक मर्यादेत न राहता जागतिक पातळीवर पोहोचतं. शिवाय जॉन के, अलेस्टर हम्फ्रेज, पर्यावरण विषय तळमळ असणारे लिअन मेककॅरन यांसारख्या लेखकांनी त्याची प्रशंसा केली आहे. शीर्षकातील ‘पूर्व’ हे केवळ एका दिशेला उद्देशून नसून नैसर्गिक विकासाला उद्देशून आहे असं वाटतं. त्यामुळे ‘जा जरा पूर्वेकडे’ हे पुस्तक आजच्या काळातील एक आवश्यक आरसा आहे, जो आपल्याला आपल्या सुरक्षित कोशातून बाहेर पडून समाजाच्या खऱया परिस्थितीकडे पाहायला भाग पाडतो.
जा जरा पूर्वेकडे
लेखक ः आशुतोष जोशी
प्रकाशक ः ग्लीच पब्लिशिंग
पृष्ठे ः 172 ह मूल्य ः 500 रुपये