
>> प्रा.सर्जेराव रणखांब
साहित्य हे केवळ सौंदर्याचा आस्वाद देणारे माध्यम नसून समाजातील घडामोडी, अन्याय, संघर्ष, आशा-निराशा, अस्तित्वाची शंका आणि भविष्याचा शोध यांचे प्रतिबिंब असते. माधव कौशिक यांच्या ‘कवी की दृष्टी से’ या हिंदी कवितांचा डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘माधव कौशिक यांची निवडक कविता’ यासंदर्भात विशेष ठरतो. या संग्रहात आजच्या काळातील राजकीय विघटन, सामाजिक विषमता, सांस्कृतिक तुटकपणा आणि अस्तित्ववादी अस्वस्थता यांचा ठसा स्पष्टपणे जाणवतो.
संग्रहात एकूण 54 कविता आहेत. यातील ‘बुद्ध हसला’ ही कविता शांतीचे गीत गाणारी आहे. सम्यक क्रांती निर्माण होईल असा आशावाद या कवितेतून व्यक्त झालेला आहे. समाजामध्ये असणारे विज्ञान हेच महत्त्वाचे आहे, युद्ध महत्त्वाचे नाही. हिंसा आणि अहिंसा यापैकी अहिंसेचा पुरस्कार कवीने केलेला आहे. या कवितांतून सामान्य माणसाचा आक्रोश व्यक्त होतो.
‘कॅन्डल मार्च’मध्ये स्त्राrवरचे अत्याचार, समाजातील हिंसा आणि सामूहिक संतापाचे चित्र आहे. ‘आफरातफरी’मध्ये आधुनिक समाजातील बेभान धावपळ, मूल्यांचा ऱहास आणि मानवी संवेदनांचा अभाव स्पष्ट होतो. ‘आई’ किंवा ‘कविता आईसारखी’ यांसारख्या कवितांत भावनिक जिव्हाळा आणि कुटुंबाचे मूल्य जपले जाते. अशा कविता समाजातील वेदना आणि संवेदनशीलता दोन्ही जतन करतात.
राजकीय व्यवस्थेबद्दल या संग्रहात तीव्र भाष्य आढळते. ‘लोकशाही’मध्ये लोकशाहीला स्त्राr रूपात दाखवून तिच्यावर होणाऱया वारांचा उल्लेख आहे. ‘प्रजातंत्र’मध्ये भ्रष्ट सत्ताधाऱयांनी लोकशाहीची मुळे कुरतडल्याचे चित्र दिसते. ‘विद्रोही’ व ‘राग आणि राग’ या कवितांत सामान्य माणसाच्या बंडखोरीचा हुंकार आहे. राजकीय दृष्टीने हा संग्रह लोकशाहीवरील विश्वास गमावलेल्या, पण लढा न सोडणाऱया जनतेच्या मनाचा दस्तऐवज ठरतो. ‘म्हातारा भूतकाळ विचारतो आहे’ व ‘लॉकडाऊन’ या कवितांत बेकारी, शेतकऱयांचे प्रश्न, स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था, भूक-तहान या आर्थिक वास्तवांचे दर्शन घडते.
‘जमिनीची वेदना’ आणि ‘पाणी’ या कवितांत भूमी, जलसंपदा, उपजीविका यांचे प्रश्न मांडले आहेत. भांडवलशाही आणि जागतिकीकरणामुळे मानवी मूल्यांचा ऱहास कसा होतो, हे कवी अधोरेखित करतो.
या कवितांमध्ये सांस्कृतिक मूल्यांचे जतन व तुटकपणा दोन्ही दिसतो. ‘शकुंतलेसाठी’ किंवा ‘तळहातावरच्या रेषा’ या कवितांत स्मृती, नातेसंबंध आणि सांस्कृतिक परंपरेचा भावनिक जिव्हाळा आहे. ‘बदल’ या कवितेत आधुनिक शहरीकरणामुळे पारंपरिक जीवनपद्धतीपासून झालेली तुटकता दिसते. सांस्कृतिक दृष्टिकोनातून हा संग्रह परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष दाखवतो. कवीने अनेक प्रतीकांचा वापर केला आहे ः ‘मेणबत्ती’ – संघर्ष आणि प्रतिकार, ‘लाव्हा’ – आक्रोश, ‘मुखवटा’ – सभ्यतेखालील क्रौर्य, ‘उजेड-अंधार’ – आशा व भीती, ‘जमिनीची वेदना’ – पृथ्वी व मानवी जीवनाचे नाते. ही प्रतीके वास्तवाच्या पलीकडे जाऊन काव्याला रूपवादी सामर्थ्य देतात.
भाषा टोकदार, थेट आणि कधी कधी घोषणापत्रासारखी आहे…
‘लाठी चार्ज करणाऱयांच्या डोळ्यातले अश्रू’, ‘रक्तबंबाळ तळवे’, ‘उजेड अंगणात उभा आहे.’ या प्रतिमा वास्तववादी असूनही काव्यात्मकतेने समृद्ध आहेत.
संग्रहातील काही कविता विद्रोहाचा आक्रोश मांडणाऱया, तर काही करुणा व स्मृती व्यक्त करणाऱया आहेत. गद्यछटासारखी सरळ भाषा असूनही लयबद्धता आणि भावनिक भार टिकून आहे. ‘आत्मसाक्षात्कार’मध्ये स्वतच्या क्रूर आणि भयानक रूपाशी झालेली भेट आहे. ‘अनंताचे प्रवासयात्रीक’मध्ये मानवी प्रवासाचा विश्वाशी संबंध जोडला आहे. ‘माणूस’मध्ये स्वतच्या आतल्या शत्रूला सामोरे जाण्याची भीती आहे. या कवितांतून अस्तित्ववादी प्रश्नांना गहिरे रूपवादी उत्तर मिळते.
‘माधव कौशिक यांची निवडक कविता’ हा संग्रह केवळ भावनिक किंवा सौंदर्यप्रधान नाही, तर सामाजिक-राजकीय दस्तऐवज आहे. यात समाजातील विसंगती, आर्थिक विषमता, लोकशाहीवरील आघात, सांस्कृतिक तुटकपणा यांचा ठसा आहे. रूपवादी दृष्टिकोनातून प्रतीकांचा वापर, प्रतिमांची धारदारता आणि अस्तित्ववादी चिंतन संग्रहाला साहित्यिक उंची देतात.
माधव कौशिक यांची निवडक कविता
मूळ कवी ः माधव कौशिक
अनुवादक ः बाळासाहेब लबडे
प्रकाशक ः सर्व भाषा प्रकाशन, नवी दिल्ली
किंमत ः 200 रुपये ह पृष्ठे ः 133



























































