प्रणाम वीरा – कारगील युद्धातील धर्मवीर

>> रामदास कामत

कारगील युद्धातील कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांचे पाच साथीदार ज्यांना युद्धकैदी झाल्यानंतर अमानुष छळाला सामोरे जावे लागले. भारतीय सेनेच्या गुप्त योजनांबाबत ब्र ही न काढता वीरमरण पत्करणाऱया देशाभिमानी जवानांची ही शौर्यकथा.

सीमेवर गस्त घालत असताना अचानक त्यांना पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला आणि युद्धकैदी बनवले. भारतीय सेनेच्या गुप्त योजना त्यांनी सांगाव्यात म्हणून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. या देशाभिमानी जवानांनी वीरमरण पत्करले. ही हृदयद्रावक शौर्यकथा आहे कारगील युद्धातील कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या पाच साथीदारांची.

कॅप्टन सौरभ कालिया यांचा जन्म 29 जून 1976 रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला. त्यांनी पालमपूर येथील डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले, तर एच.पी. कृषी विद्यापीठ, पालमपूर येथून वैद्यकीय शास्त्रात पदवी प्राप्त केली. विविध शिष्यवृत्ती मिळवलेला एक हुशार विद्यार्थी, पण त्यांना आस होती गणवेशाची, ध्येय होते देशासाठी काहीतरी करण्याचे.

कॅप्टन सौरभ यांची ऑगस्ट 1997 मध्ये संयुक्त संरक्षण सेवांद्वारे भारतीय लष्करी अकादमीसाठी निवड झाली आणि 12 डिसेंबर 1998 रोजी त्यांना जाट रेजिमेंटच्या 4 जाटमध्ये जी एक पायदळ रेजिमेंट आहे तिथे कमिशन मिळाले. कॅप्टन सौरभ यांची पहिली नियुक्ती जम्मू-कश्मीरमध्ये कारगील सेक्टरमध्ये करण्यात आली. 31 डिसेंबर 1998 रोजी बरेली येथील जाट रेजिमेंट सेंटरमध्ये ते दाखल झाले. युनिटमध्ये लेफ्टनंट म्हणून सामील झालेल्या त्यांना वयाच्या 22 व्या वर्षी स्वकर्तृत्वावर कॅप्टन पदावर बढती मिळाली.

1999 मध्ये कॅप्टन सौरभ यांच्या तुकडीला कारगीलपासून अगदी जवळ असलेल्या काकसर भागात तैनात करण्यात आले होते. मे 1999 च्या सुरुवातीला बटालिक-यलदोर सेक्टरमध्ये असामान्य हालचाली दिसून आल्या. परिणामी, भारतीय लष्कराच्या तुकडय़ांनी या भागात आक्रमक गस्त घालण्यास सुरुवात केली. 15 मे 1999 रोजी कॅप्टन सौरभ कालिया यांना बजरंग पोस्टवर गस्त घालण्याचे काम सोपवण्यात आले. कॅप्टन सौरभ आणि इतर पाच शिपाई सैनिक अर्जुन राम बसवाना, बनवारीलाल बगारिया, भिखाराम मुंढ, मूलाराम बिडियासर आणि नरेश सिंग सिनसीनवार नियोजित वेळेनुसार बजरंग चौकीकडे निघाले. नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानी सशस्त्र दलांशी सतत गोळीबार झाल्यानंतर कॅप्टन सौरभ आणि त्यांच्या सैन्याचा दारूगोळा संपला. त्यांनी बेस कॅम्पला ही बाब कळवली आणि अधिक सुरक्षा मागवली. तथापि, सैन्य पोहोचण्यापूर्वीच त्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या एका पलटनने वेढले आणि कैदी बनवले. त्यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्याने मोठय़ा प्रमाणात शोध मोहीम सुरू केली.

कॅप्टन सौरभ आणि त्यांचे सैनिक 15 मे 1999 ते 7 जून 1999 पर्यंत सुमारे 22 दिवस पाकिस्तानच्या कैदेत होते. 9 जून 1999 रोजी पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत भारताला भेट म्हणून पाठवले. पाकिस्तानी सैन्याने कॅप्टन सौरभ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताच्या लष्करी योजना त्यांना सांगाव्यात म्हणून त्यांचा अनन्वित छळ केला. पण या कट्टर देशप्रेमी, देशाभिमानी निष्ठावान जवानांनी वीरमरण पत्करले, पण एकानेही तोंड उघडले नाही. जिनेव्हा करार भाग 2 कलम 13 (युद्धकैद्यांचे सामान्य संरक्षण) नुसार युद्धकैद्यांना नेहमीच मानवी वागणूक देऊन त्यांना सर्वतोपरी संरक्षण दिले पाहिजे, पण याचे बिनदिक्कत उल्लंघन पाकिस्तानी सैन्याने केले.

कॅप्टन सौरभ कालिया यांच्या वैयक्तिक वस्तू जसे की छायाचित्रे, गणवेश, बूट आणि स्मृतिचिन्हे पालमपूरच्या त्यांच्या ‘सौरभ निकेतन’च्या ‘सौरभ स्मृति कक्ष’मध्ये जतन केल्या गेल्या आहेत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिमाचल प्रदेश सरकारने पालमपूरमध्ये 35 एकर क्षेत्रात ‘सौरभ वन विहार’ नावाचे स्मारक उद्यान उभारले आहे. शिवाय त्यांचा पुतळा अमृतसरमधील एका स्मारकात उभारण्यात आला आहे.

कॅप्टन सौरभ कालिया यांचे कुटुंब सरकारकडून जेनेव्हा कराराच्या उल्लंघनाविरोधात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनीही त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि फ्लॅग्स ऑफ ऑनर फाऊंडेशनने 7 डिसेंबर 2012 रोजी जिनेव्हा येथील मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाचे विशेष प्रतिनिधी जुआन ई. मेंडेझ यांच्यासमवेत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद कडे याचिका दाखल केली. कालिया कुटुंबाला अजूनही न्याय मिळाला नाही हे खरे आहे, परंतु त्यांनी न्यायासाठी आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
[email protected]