
>> अरुण
संवाद-संपर्क भाषेचा उगम व्हाय्यला सुरुवात झाली ती दीड ते दोन लाख वर्षांपूर्वी. परंतु तोपर्यंत आपण आता वापरात आणतो तशा व्याकरणसिद्ध भाषा तयार झाल्या नव्हत्या. उत्क्रांतीच्या काळातील काही गोष्टी युनिव्हर्सल किंवा जागतिक म्हणाव्या अशा होत्या त्या खाणाखुणांच्या स्वरूपात. उदा. गप्प बसणे अशा अर्थाने तोंडावर बोट ठेवण्याची खूण जगात कुठेही सारखीच. `या’ किंवा `जा’ संकेतही समानच. परंतु प्रत्येक भाषेत त्यासाठीचे ध्वनी निराळे. `न’काराचा उच्चार मात्र जगातल्या बऱयाच भाषांत `न’ ध्वनीने सुरू व्हावा हा योगायोग. नाही… नो… नियत (रशियन) अशी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक गंमत म्हणजे काही उच्चारांचे अपपाश किंवा बदल जगात अनेक ठिकाणी सारखे असतात. हे आपल्या लक्षात येत नाही. `य’ चा `ज’ किंवा `व’ चा `ब’ होणे हा त्यातलाच प्रकार. `यमुना’चं `जमुना’ होतं तसं `विहिरी’साठीच्या `वाव’ शब्दाची `बाव’ होते. बंगालीत तर `व’ नाहीच. त्यांच्या भाषेत कवी शब्द प्रथमाक्षर `ओ’कारान्त केल्याने `कोवि’ आणि `रवी’चं `रोबी’ होतं. अमेरिकेतसुद्धा विल्यमचा `बिल’ होतो!
इंग्लिश भाषा, त्यांच्या जागतिक राजवटीमुळे जगात सर्वत्र पसरली आणि समजू लागली तरी त्या भाषेचं लिखाण उच्चारानुवर्ती नाही. एका `क’ उच्चारासाठी ते `सी’ (पाट) सीएच (केमिस्ट्री) `के’ (काइट) आणि `क्यू’ (कोटा) अशी विविध मुळाक्षरे वापरात. अवघ्या सव्वीस मुळाक्षरातली चार एका उच्च किंवा अनेक उच्चारांची ही त्या भाषेची मर्यादा पण कमीत कमी मुळाक्षरात अभिव्यक्ती बसवणं हे बलस्थान. त्या तुलनेत देवनागरी (मराठी-संस्कृत) लिपी खऱया अर्थाने उच्चानुवर्ती. ही लिपी येत असेल तर सांगणाऱयाला नेमकं काय म्हणायचंय ते लिखित स्वरूपातही स्पष्टपणे कळते.
काही भाषेत एका अक्षराचे सौम्य-तीव्र दोन उच्चार असतात. (तामिळ-त-थ) मराठीत अनुस्वाराने शेवटच्या अक्षराचा पूर्वोच्चार होतो (तुझं-माझं) वास्तविक तिथे वेगळी आडव्या रेषेची (-) खूण असेल तर कोणी तुझम् – माझम् असा उच्चार करू शकणार नाही. आमच्या एका मित्राने अमेरिकेतल्या मुलांना मराठी शिकवताना बाराखडीतच गरजेनुसार `आ’ असा उच्चार समाविष्ट करून ती तेराखडी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही इ (अि) उ (अु) असे बदल सुचवले होते. जगातल्या विविध लिपी हा मात्र आनंददायी अभ्यासाचा विषय आहे.