पंचलाइन – अतिशयोक्तीपर कथाकार

>> अक्षय शेलार

जगभरात स्टँड-अप कॉमेडीविषयी भन्नाट सादरीकरण होते. स्टँड-अप हा प्रकार आज लोकप्रियतेच्या टप्प्यावर पोहोचला आहे . मनोरंजनाच्या या महत्त्वाच्या प्रयोगाविषयी कमी लिहिले, बोलले जाते. या क्षेत्राचा वेध घेताना भारतातील व जगभरातील कॉमेडियन्स, त्यांचे कार्यक्रम, सादरीकरण, त्यांची व्यापकता याबाबत माहिती देणारे सदर.

अमेरिकन स्टँड-अप कॉमेडीमध्ये गेल्या दोन दशकांत काही निवडक कॉमेडियन्सनी स्वतचं एक वेगळं, ठसठशीत स्थान निर्माण केलं. त्यात जॉन मलेनीचं नाव घेणं अपरिहार्य ठरतं. त्याचा स्टेजवरचा वावर, लेखनाची धार आणि सादरीकरणाची अचूक नाटय़मयता हे तिन्ही घटक त्याच्या विशिष्ट ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, त्याच्या विनोदाची खरी ताकद केवळ लिहिलेल्या मजकुरात किंवा पंचलाइन्समध्ये नसून तो मजकूर तो ज्या पद्धतीने सादर करतो त्या शैलीमध्ये आहे. ही अतिशयोक्त, नाटय़मय, लयबद्ध शैली अमेरिकन कॉमेडीच्या परंपरेत फार कमी लोकांकडे दिसते.

मलेनीच्या सादरीकरणातले सर्वात प्रथम जाणवणारे वैशिष्टय़ म्हणजे त्याची आवाजाची चढ-उतारांवरची पकड. तो प्रत्येक वाक्य जणू नाटकातील संवादासारखं घडवतो. यामध्ये मुद्दाम निर्माण केलेल्या विरामांचा, अनपेक्षित जागांचा वापर मोठय़ा प्रमाणात दिसतो. त्याची ही शैली ओव्हरअॅक्टिंगच्या जवळ जाणारी आहे, पण ती उथळ नाटकीपणामध्ये रूपांतरित होत नाही. उलट, ती एक शिस्तबद्ध रचना घेऊन येते. उदाहरणार्थ, त्याच्या `न्यू इन टाऊन’ (2012) या स्पेशलमधील `व्हॉट्स न्यू पुसीकॅट?’ गाण्याबाबतचा किस्सा त्याच्या मांडणीतला वेग, घाई आणि अचानक येणारे विराम हे सगळं एक प्रकारचा ताल तयार करतं. हा तालच पंचलाइनला अधिक धार देतो. त्याच्या विनोदाचा दुसरा ठळक पैलू म्हणजे `कथाकथन’ केंद्रस्थानी ठेवणारी रचना. मलेनी क्वचितच स्वतंत्र, एक ओळी विनोदांवर अवलंबून राहतो. त्याऐवजी तो एक दीर्घ, सुसंगत गोष्ट रंगवतो. तो सांगत असलेली गोष्ट अनेकदा स्वतच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारलेली असते. त्याच्या गोष्टींमध्ये प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवणारी एखादी मध्यवर्ती व्यक्तिरेखा असते. मलेनीचा हजरजबाबीपणा त्याचं मुख्य शस्त्र असलं तरी त्याचं सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे ही बिल्ड-अप आणि त्यानंतरची खळखळून हसविणारी मुक्ततेची पद्धत.
अमेरिकन कॉमेडीच्या संदर्भात पाहिल्यास मलेनीची शैली जुन्या प्रभावांशी घट्ट जोडलेली आहे. त्याने उघडपणे कबूल केलं आहे की, तो नाटय़कला, जुने वॉडव्हिल परफॉर्मर्स तसेच `सॅटर्डे नाइट लाइव्ह’च्या (एसएनएल) क्लासिक काळातून प्रेरणा घेतो. खरं तर मलेनीने स्वत एसएनएलवर लेखक म्हणून काम केले आहे आणि त्या काळातील स्केच रायटिंगच्या गतीचा, रिदमचा प्रभाव त्याच्या स्टँड-अपवरही दिसतो. त्याच्या विनोदात आत्मवंचनापर विनोद (स्वतवरचे विनोद व टोमणे) मोठय़ा प्रमाणावर आढळतो, पण तो ते केवळ हसविण्यासाठी वापरत नाही. बऱयाचदा त्याचा हेतू स्वतच्या उणिवांवरून अमेरिकन समाजातील सामूहिक वर्तनांवर प्रकाश टाकणं असतो. उदाहरणार्थ, `किड गॉर्जिअस अॅट रेडिओ सिटी’मधील (2018) कॉलेज कर्ज, शिक्षकांचे विचित्र स्वभाव किंवा बालपणीचे अनुभव ही सगळी उदाहरणं स्वतच्या कथेतून येतात, पण त्यातून एका मोठय़ा सांस्कृतिक संदर्भाची झलक पाहायला मिळते. मलेनीचं स्टेजवरील व्यक्तिमत्त्व हा त्याच्या शैलीचा महत्त्वाचा घटक आहे. तो नीट सूटबूट घालून, शिस्तबद्ध, सौजन्यशील, किंचित जुनाट भासणारी व्यक्ती म्हणून समोर येतो आणि मग या सभ्य प्रतिमेच्या आडून हळूहळू विसंगत, अतर्क्य, किंचित धोकादायक किंवा अनपेक्षित निरीक्षणं मांडतो. हा विरोधाभासच त्याच्या विनोदाची मजा वाढवतो. ही नीटनेटक्या, सुसंस्कृत बाह्य प्रतिमेतून विस्फोटक मजकूर देण्याची पद्धत अमेरिकन स्टँड-अपमध्ये जॉर्ज कार्लिनच्या राजकीय धारदार विनोदाइतकी उग्र नसली तरी आपली स्वतंत्र तीव्रता राखून असते.

त्याच्या सादरीकरणातील अतिशयोक्ती हा केवळ नाटकीपणाचा परिणाम नाही. विनोद सांगताना तो एखाद्या वाक्यातील शब्द मुद्दाम लांबवतो, अनपेक्षित शब्दांवर भर देतो किंवा अचानक आवाज कमी करून पुटपुटतो आणि लगेच पुढच्या क्षणी जोरात ओरडतो. त्यामुळे प्रेक्षक सतत सजग राहतात. कुठलीच गती एकसुरी वाटत नाही. टायमिंग हा घटक त्याच्या प्रत्येक सेटमध्ये प्रचंड अचूकतेने हाताळलेला असतो. मलेनीच्या करीअरमध्ये विनोदाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांची छाया दिसते. त्याच्या अलीकडच्या टूरमध्ये त्याने स्वतच्या ड्रग अॅडिक्शन, रिहॅब अनुभव यावर थेट भाष्य केलं. हा टोन पूर्वीच्या तुलनेत अधिक कबुलीजबाबपर आहे, पण त्यातही त्याची वैशिष्टय़पूर्ण गती, नाटय़मय चढ-उतार आणि पंचलाइन्स आढळतात. त्यामुळे त्याचा विनोद पॉलिश्ड स्टेज-अॅक्ट न राहता एक वैयक्तिक प्रवास ठरतो, जो प्रेक्षकांना हसवतानाच अस्वस्थही करतो.

अमेरिकन स्टँड-अपच्या विस्तृत पटावर मलेनीचं स्थान हे क्लासिक शोमन आणि आधुनिक कथाकथनकार यांच्यामधलं कुठलं तरी आहे. तो आपल्या नाटय़मय सादरीकरणाला आधुनिक संवेदनशीलतेची जोड देतो, ज्यात स्वतवर हसणं, सांस्कृतिक विसंगती उलगडणं आणि प्रेक्षकांना सोबत घेणं या सगळ्यांचा समतोल असतो. मलेनीच्या अतिशयोक्त सादरीकरणामुळे त्याचा प्रत्येक कार्पाम एक सूक्ष्म रीत्या आखलेली कामगिरी ठरतो, ज्यात लेखन, लय, शरीरभाषा आणि प्रेक्षकांसोबतची अदृश्य संवाद रेषा एकत्र विणलेली असते आणि म्हणूनच, अमेरिकन स्टँड अपच्या गजबजलेल्या रंगमंचावर जॉन मलेनीचं नाव आजही ठळकपणे आठवत राहतं. जॉन मलेनीचं काम नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
[email protected]