साय-फाय – झोहो : स्वदेशीचा नारा

>>प्रसाद ताम्हनकर

हिंदुस्थान सध्या एका अत्यंत खडतर परिस्थितीमधून जातो आहे. जगाच्या अनेक कोपऱ्यात युद्ध आणि अशांततेचा भडका उडालेला असताना आणि देशाच्या विविध सीमांवर तणाव असताना आता अमेरिकादेखील हिंदुस्थानच्या अडचणीत भर टाकताना दिसते आहे. अमेरिकेसारख्या महाशक्तीशी झुंज देणे ही काही सोपी गोष्ट नाही. हिंदुस्थानवर तिने टाकलेला अतिरिक्त कराचा बोजा, व्हिसाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढ याच्याशी लढायचे असेल तर आपल्याला स्वदेशीचा जागर हा करावाच लागणार आहे. अशा वेळी देशाच्या पंतप्रधानांनीदेखील सर्व जनतेला स्वदेशी उत्पादने आणि सेवा वापरण्याचे आवाहन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगल किंवा मापोसॉफ्टसारख्या परदेशी कंपनीचा प्लॅटफॉर्म वापरण्याऐवजी ‘झोहो’सारखा स्वदेशी प्लॅटफॉर्म वापरण्याची सुरुवात केली आणि तशी घोषणादेखील केली.

केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेनंतर झोहो हा स्वदेशी प्लॅटफॉर्म अचानक चर्चेत आला आहे. सामान्य लोकांसाठी काहीसे नवे असलेले हे नाव तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र मोठे प्रसिद्ध असलेले नाव आहे. अनेक नामांकित कंपन्या आपल्या डिजीटल कारभारासाठी झोहोच्या प्लॅटफॉर्मचा वापर गेला बराच काळ करत आहेत. झोहो कंपनी मापोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्यांप्रमाणे क्लाऊड सेवांचा पुरवठा करते. मापोसॉफ्ट ऑफिस गुगल वर्कस्पेस ज्या विविध सुविधा ग्राहकांना पुरवते जसे की स्प्रेडशीट तयार करणे, प्रेझेंटेशन बनवणे, ईमेल्स पाठवणे आणि मिळवणे त्या सर्व सुविधा झोहो आपल्या zoho books, zoho CRM, zoho mail सेवांच्या माध्यमातून पुरवते.

झोहोच्या या सर्व सेवा अत्यंत दर्जेदार आणि वापरण्यास सुलभ असल्याने त्यांचा चाहता वर्गदेखील मोठय़ा प्रमाणावर आहे. अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयाचे या चाहत्यांकडून मोठय़ा प्रमाणावर स्वागत करण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि सध्या विद्यार्थी दशेत असलेल्या अनेकांनी झोहोबद्दलचे त्यांचे अनुभव सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात शेअर केले आहेत. झोहोच्या या सर्व सेवा परदेशी कंपन्यांच्या तुलनेत खूप स्वस्त असल्याचेदेखील अनेकांनी आवर्जून नमूद केले आहे.

गेली दोन दशके प्रचंड मेहनत घेऊन नावारूपाला आलेल्या झोहोची स्थापना श्रीधर वेम्बू यांनी केली. आपल्या या यशाचे श्रेय श्रीधर हे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांनादेखील देतात आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतात. झोहो ही कंपनी चेन्नईमध्ये कार्यरत असली तरी स्वत श्रीधर वेम्बू मात्र चेन्नईपासून 630 किलोमीटर दूर असलेल्या तेनकासीजवळील मथालमपराई या छोटय़ाशा सुंदर गावातून सगळा कारभार बघतात. लोक गावाकडून व्यवसाय, नोकरीच्या शोधात जात असताना, शहरी माणसाला गावाकडे पुन्हा वळवण्यासाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. त्यासाठी त्यांनी या खेडय़ात एक सॅटेलाईट ऑफिसदेखील बनवले आहे. झोहोच्या कारभारासोबत ते गावाच्या सामुदायिक विकासासाठीदेखील अनेक संकल्पना राबवत असतात. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत 72 व्या गणतंत्र दिवसाला त्यांना `पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आलेले आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये जरी सध्या झोहो हे नाव प्रचंड गाजत असले आणि स्वदेशी प्लॅटफॉर्म म्हणून अनेकांचा त्याच्याकडे ओढा वाढत असला तरी झोहो ही कंपनी अमेरिकेत रजिस्ट्रर्ड झालेली आहे आणि तिचे मूळ कार्यालयदेखील तिकडे आहे, याकडेदेखील काही जाणकारांनी लक्ष वेधले आहे. ट्रम्पसाहेबांचे एकूण रागरंग बघता झोहोची लोकप्रियता प्रचंड वाढल्यास ते एखाद्या मार्गाने तिलादेखील लक्ष्य करण्याचा प्रयत्न करून शकतात, अशी भीतीदेखील व्यक्त होत आहे. काही काळापूर्वी ट्विटरला टक्कर देण्यासाठी स्वदेशी अशा कू अॅपची अशीच प्रसिद्धी झाली होती. त्यावेळीदेखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटर सोडून कू कडे आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी कू अॅपलादेखील प्रचंड लोकांनी आपली पसंती दिली होती. मात्र अवघ्या दोन वर्षांत पुरेशा भांडवलाअभावी ही कंपनी बंद करण्याची नामुष्की संस्थापकांवर आली होती याचीदेखील आठवण काही तज्ञांनी यावेळी करून दिली आहे.
[email protected]