महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? रमेश चेन्नीथला यांचा सवाल

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी तरी ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत का? असा रोखठोक सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विचारला आहे.

पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावी बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य़ खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, पृथ्वीराज साठे, कोषाध्यक्ष अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना सरकारची मदत मात्र अद्याप मिळालेली नाही. हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे पण सरकारने एक दमडीही दिलेली नाही. फक्त मदतीच्या पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीने निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची पण सरकार मात्र त्यावर काहीच बोलत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले. यावेळी त्यांनी राज्यातील गंभीर परिस्थितीची माहिती देऊन भरीव पॅकेज घेऊन येणे क्रमप्राप्त होते पण मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा गडचिरोलीतील खाण उद्योगपतीचीच जास्त चिंता आहे. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याशीही खाण उद्योग व मुंबईतील फिनटेक परिषदेसंदर्भातच चर्चा केली आणि शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज न घेताच रिकाम्या हाताने महाराष्ट्रात परतले.

शेतकरी संकटात पण जिल्ह्याधिकारी नाचण्यात मस्त
मराठवाड्यात अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, दुखःत आहे असे असतानाही धाराशिवचे जिल्हाधिकारी व तहसिलदार मात्र बॉलिवूडच्या गाण्यावर नाचत आहेत, हे असंवेदनशिल असून हे काय चालले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना परिस्थितीचे काही गांभीर्य आहे का नाही, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी विचारला..

निवडणूक आयोगाची भूमिका भाजपधार्जिणी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत VV Pat वापरणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, हा निर्णय भाजपाला मदत करणारा आहे त्यावर काँग्रेसला हरकत आहे व त्याची रितसर तक्रार केली जाणार आहे. स्थानिक निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टाला सांगावे लागले कारण राज्य सरकारला या निवडणुका घेण्यात स्वारस्य नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष असायला हवे पण ते सत्ताधारी भाजपाकडे पूर्णपणे झुकले आहे. लोकांना निवडणुकांवर संशय येऊ लागला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह मतचोरीचा पर्दाफाश केला पण निवडणूक आयोग मात्र त्यावर खुलासा करु शकला नाही, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावा बैठक.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली, यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुल्यांकन, नियोजन व अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर, शेतकऱ्यांच्या मदतीवरही यावेळी चर्चा करण्यात आली.