निसर्ग कोपला… महाराष्ट्रावर बरस बरस बरसला, जनजीवन विस्कळीत

सध्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, मराठवाडा, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र अशा अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे. रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरल पावसाचा रेड अलर्ट असून मराठवाडा, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने महाराष्ट्राची अक्षरश: दाणादाण उडवली आहे. त्यामुळे निसर्ग महाराष्ट्रावर कोपला की काय असे विचारण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्याला गेल्या आठवड्याभरापासून पाऊस झोडपत असून तिथली परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. अजुनही मराठवाड्यात पाऊस सुरू असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन घरात बसले आहेत. मराठवाड्यात एकीकडे पावसामुळे बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे तर दुसरीकडे लोकांचे पूराचे पाणी घरात शिरल्याने लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आपली आयुष्यभराची कमाई खुल्या आकाशाखाली ठेवून झोपणाऱ्या बळीराजाला मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने डोळ्याला डोळा लागू दिलेला नाही. त्यात गेल्या आठ दिवसात मराठवाड्यात मोठा हाहाकार उडाला आहे.

मुंबई, ठाण्याला रविवारी पावसाचा रेड अलर्ट

रविवारी 28 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. या व्यतिरिक्त नाशिक व पुण्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

गोदावरीला पुन्हा पूर आला तर …

नाशिकमध्ये शनिवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस रात्रभर असाच सुरू राहिला तर गोदावरीला पुन्हा पूर येऊ शकतो. व गोदावरीला पूर येणे ही पुन्हा एकदा मराठवाड्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते. कारण गोदावरीला पूर आला तर ते पाणी वाहून नांदेडच्या दिशेने जाते. आधीच नांदेडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात गोदावरीच्या पाण्याची भर पडली तर परिस्थिती अधिक चिंताजनक होईल.