
लेहमधील ‘जेन-झी’ आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना देशभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. सरकारी दडपशाहीचा सर्वत्र निषेध होत असतानाच सरकारी यंत्रणांनी वांगचुक यांचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा डाव आखला आहे.
पूर्ण राज्याची मागणी व रोजगारासाठी सुरू असलेल्या लडाखी तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. संतप्त तरुणांनी भाजपचे कार्यालय जाळून टाकले. या सगळय़ा आंदोलनाचा ठपका सरकारने वांगचुक यांच्यावर ठेवला आणि त्यांना थेट रासुकाखाली अटक केली. त्यानंतर आता त्यांना गंभीर गुह्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
लडाखचे पोलीस महासंचालक जामवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत वांगचुक यांच्यावर आरोप केले. ’वांगचुक यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र ’डॉन’च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी बांगलादेशचाही दौरा केला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आम्हाला संशय आहे, असे ते म्हणाले. ’लडाखमधील आंदोलकांसमोर भाषणे करताना वांगचुक यांनी अरब स्प्रिंग, नेपाळ आणि बांगलादेशील आंदोलनाचे दाखले दिले होते, असेही जामवाल म्हणाले.
लडाखच्या प्रश्नांवर पेंद्र सरकारची लेह अॅपेक्स बॉडी (लॅब) आणि कारगिल डेमोव्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत चर्चा सुरू होती. मात्र, वांगचुक यांनी पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या परिशिष्टाचा हट्ट धरून चर्चेच्या प्रक्रियेत मोडता घातला, असा आरोपही जामवाल यांनी केला.