मराठवाड्यासाठी रात्र वैर्‍याची! छत्रपती संभाजीनगरातील 68 मंडळांत अतिवृष्टी, गोदाकाठच्या सर्वच जिल्ह्यांत हाहाकार

परतीच्या पावसाने आज पुन्हा मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे. सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने हाहाकार उडाला आहे. पैठणच्या नाथसागरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सर्व २७ दरवाजे उघण्यात आले असून, अडीच लाख क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या जालना, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ही रात्र वैर्‍याची आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने ६२ गावांतील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत.

परतीच्या पावसाने आणखी जोर धरला असून, दोन दिवसांत पावसाने मराठवाड्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहात आहेत. त्यातच नाशिक भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१.२ मि.मी इतके असून, आजपर्यंत ८१८.५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यात गेल्या २४ तासांत ११०.३ मि.मी पर्जन्यमान नोंदविण्यात आले. एकूण वार्षिक १४०.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ पैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली. त्यात छत्रपती संभाजीनगरात कांचनवाडीत १४५, गंगापुरात सर्वाधिक हर्सूल आणि डोणगाव येथे १९६, वैजापूरच्या शिउâरमध्ये १८९, कन्नडच्या देवगावात १६६, रत्नपूरच्या वेरुळमध्ये १८०, सोयगावच्या बनोटीत १०३ आणि फुलंब्रीच्या बाबर्‍यात १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

३५४ नागरिकांना वाचवले

रात्रभर कोसळलेल्या पावसाने सर्वत्र पूरच पूर आले. त्यात अनेकजण अडकून पडले. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी पुरात अडकलेल्या तब्बल ३५४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. मदन झब्बू राठोड (५५, रा. गराडा, ता. कन्नड) हे ब्राह्मणी नदीत वाहून गेले असून, त्यांचा शोध लागलेला नाही. सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांड्यावरील ६ शेळ्या पुरात वाहून गेल्या. रत्नपूर तालुक्यातील बाजारसावंगी येथे ६, काटशिवरी फाटा येथे ३, भिवगाव येथे २७ व बाबुळगाव येथे १७ नागरिक पुरात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वैजापूर तालुक्यात भिवगाव येथे २७, बाहुळगाव येथे १५, नारायणपूर येथे १८, हडस पिंपळगाव येथे एकास सुखरुप बाहेर काढण्यात आले. वैजापूर नगर परिषद क्षेत्रात २५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात अंतापूर येथे ४, देवगाव रंगारी येथे ६ नागरिकांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. गंगापूर तालुक्यात अमळनेर येथे २२, तसेच काटे पिंपळगाव येथे ४ तर पेंडापूर येथे ५, नरसापूर येथे एक आणि मालुंजा येथील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशा जिल्ह्यातील एकूण १५ गावांतील ३७९ पैकी ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

जायकवाडीतून २ लाख २६ हजार क्युसेक विसर्ग

जायकवाडी धरणाची पाणीसाठा स्थिती ९७.८० टक्के इतकी असून, सध्या २ लाख २६ हजार ३६८ क्युसेस विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. पैठण तालुक्यात गोदावरी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूरबाधितांची व्यवस्था प्रशासनामार्फत शाळांमध्ये करण्यात आली आहे.

नांदेडच्या तेरा मंडळांत अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यातील तेरा मंडळांमध्ये आज सकाळी आठ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली असून, विष्णुपुरी प्रकल्पातून जवळपास दोन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढवल्याने १३ नगरांमध्ये पाणी शिरले. आज दुपारी चार वाजेपर्यंत ९०७ जणांना विविध नगरातून मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना बाहेर काढून मनपाच्या निवारा कक्षात सुरक्षितस्थळी हलवले. भोकरमध्ये एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भवानी तांडा येथे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने ३५ शेळ्या वाहून गेल्या. पावसाचा वेग थांबला असला तरी पुराचे पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

शेतकर्‍यांचा सामूहिक जलसमाधीचा प्रयत्न

गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी देशोधडीला लागले असताना भाजपचे आमदार राजेश पवार यांनी ढुंकूनही पाहिले नाही. तसेच प्रशासनाकडून मदतीचा छदामही न मिळाल्याने रोशनगाव येथील संतप्त शेतकर्‍यांनी आज रविवारी सामूहिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पाण्यामुळे शेती जलमय झाली, जनावरांसाठी चारा नाही. तरीही प्रशासन गाढ झोपल्याचा आरोप करत त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी १७ ते १८ जणांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तत्काळ धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

बीडमधील ६२ गावांवर स्थलांतराची तलवार

जायकवाडी प्रकल्पात आवक वाढल्याने गोदापात्रात अडीच लाख क्युसेस पाणी सोडले जात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ६२ गावांसाठी घबराट पसरली आहे. गावागावांत दवंडी देऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. जायकवाडीतून येणार्‍या अडीच लाख क्युसेस पाण्यात बिंदुसरा, सिंदफणा, कुंडलिकाच्या एक लाख क्युसेस पाण्याची भर पडणार असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पाण्याचा विसर्ग वाढवला तर काय या भींतीने गेवराईतील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे.

परभणी, हिंगोलीत पाणीच पाणी

माजलगाव प्रकल्पातून सोडलेले पाणी तसेच पूर्णा, गोदावरी आणि कयाधू नद्या तुडुंब झाल्याने परभणीत पूर वाढला आहे. येलदरी धरणाचे १० आणि निम्न दुधना प्रकल्पाचे ८ दरवाजे उघडल्याने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये नद्या पात्र सोडून वाहू लागल्याने शेत आणि गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.