
2026 च्या फिफा वर्ल्ड कपसाठी फुटबॉल चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या तिकिटांसाठी लॉटरीपूर्व विक्री सुरू होताच फक्त 24 तासांत 210 देशांमधून तब्बल 15 लाख अर्ज फिफाकडे पोहोचले असल्याची माहिती फिफाने दिली. या वर्ल्ड कपच्या तिकिटांसाठी सर्वाधिक मागणीचे अर्ज अमेरिकन खंडातून लाभले आहेत. यात यजमान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडासह अर्जेंटिना, कोलंबिया, ब्राझील, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि जर्मनीतील चाहत्यांनीही तिकिटांसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. एका दिवसांत झालेल्या अर्जांचा आकडा पाहता फिफा वर्ल्ड कपची लोकप्रियता किती प्रचंड आहे याची कल्पना आली आहे. आगामी स्पर्धा मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेतल्या 16 यजमान शहरांत खेळवली जाईल. उद्घाटन सामना 11 जून 2026 रोजी मेक्सिको सिटीत होणार आहे.