
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 12 ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा (एसजीएम) बोलावली आहे. या एसजीएम संघटना नवी घटना आणि दुरुस्ती स्वीकारणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुधारित घटना मंजूर करण्यासाठी ही सभा घेण्यात येत आहे. जागतिक फुटबॉल संघटना फिफाने एआयएफएफला 30 ऑक्टोबरपर्यंत नवी घटना स्वीकारण्याची अंतिम मुदत दिली आहे.
ही विशेष सभा केवळ घटना अंगीकारण्यासाठीच बोलावली आहे. याशिवाय अन्य कोणताही अजेंडा नसल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ एआयएफएफ अधिकाऱयाने दिली. ही सभा दिल्लीतील मुख्यालयात होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी तयार केलेला घटनेचा मसुदा काही बदलांसह मंजूर केला होता आणि एआयएफएफला चार आठवडय़ांत विशेष सर्वसाधारण सभेत तो स्वीकारण्याचे निर्देश दिले होते. या घटनेत कायमस्वरूपी बदल सुचवले असून, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात एकूण 12 वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करता येणार नाही, तसेच सलग दोन कार्यकाळ (प्रत्येकी चार वर्षांचे) पूर्ण केल्यानंतर चार वर्षांचा विश्रांती कालावधी बंधनकारक राहील. तसेच 70 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावर कोणीही महासंघाचा सदस्य राहू शकणार नाही, असेही नमूद आहे.