
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून गेलेल्या एकाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. पप्पू नायक असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेसाठी सांताक्रुझ पोलिसांनी दहा दिवसा फिल्डिंग लावली होती. न्यायालयाने नायकला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी सांताक्रुझ परिसरात राहते. 12 दिवसांपूर्वी ती साहित्य आणण्यासाठी गेली होती तेव्हा तिला अचानक एकाने मागून नकोसा स्पर्श करून पळ काढला. भररस्त्यात घडलेल्या घटनेने ती मुलगी घाबरली. तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी हा जुहू परिसरात असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी दहा दिवस जुहू परिसरात फिल्डिंग लावून पोलिसांनी त्याला अटक अटक केली. नायक हा मूळचा ओडिशाचा रहिवासी आहे.