
पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात देश उभा ठाकला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांच्या अटकेचा निषेध केल्यानंतर आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निषेधाचा आवाज बुलंद केला. आंदोलकांवर गोळीबार आणि अटका हा लोकशाहीची मागणी करणाऱ्या लडाखवर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हल्लाच आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांचे पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्ट करून भाजप, आरएसएसवर हल्ला केला आहे. लेहमधील हिंसाचाराला पेंद्र सरकारच जबाबदार आहे, असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला. लडाखच्या जनतेला आपली गाऱहाणी मांडण्यासाठी लोकशाही व्यासपीठ हवे आहे हीच मागणी ते करत होते. मात्र भाजपने चार तरुणांची हत्या करून आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगात पाठवून त्यास प्रतिसाद दिला. लडाखच्या समृद्ध संस्कृती व परंपरेवर भाजप व आरएसएसने हल्ला केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकशाहीसाठी आवाज
लडाखमधील हिंसाचार, हत्या आणि दमनशाही थांबवा. लडाखच्या जनतेला त्यांच्या हक्काचे लोकशाही व्यासपीठ मिळवून द्या आणि घटनेच्या सहाव्या परिशिष्टात सहभागी करून घ्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.