
‘आयएसएसएफ’ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. ओजस्वी ठाकूरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आज 10 मीटर महिलांच्या नेमबाजीत पदकांची लयलूट केली. ओजस्वीने सुवर्णपदक पटकावले, हृदया श्री कोंडूरने रौप्य, तर शांभवी क्षीरसागरने कांस्यपदकाची कमाई केली. दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या अंतिम फेरीत ओजस्वीने आपल्या आठव्या आणि सोळाव्या
शॉटमध्ये 10.9 अशा गुणांसह एकूण 252.7 गुण मिळवत किताबावर आपले नाव कोरले.
हृदया श्रीने 250.2 गुणांसह दुसरे स्थान, तर पात्रता फेरीत अव्वल ठरलेल्या शांभवीने 229.4 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. हिंदुस्थानच्या या त्रिकुटाने पात्रता फेरीतच आपला दबदबा राखत पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला होता. शांभवी 632 गुणांसह प्रथम, तर ओजस्वी (631 गुण) आणि हृदया श्री (629.8 गुण) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. पात्रता फेरीत आठव्या स्थानी राहिलेल्या क्रोएशियाच्या अनामारिजा तुर्क हिने अंतिम फेरीत जोरदार पुनरागमन करताना चौथे स्थान मिळवले. तिने अंतिम फेरीत 206.6 गुणांपर्यंत मजल मारली.
हिमांशूचीही सोनेरी कामगिरी
हिंदुस्थानच्या हिमांशूने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरीतही आपली लय कायम ठेवली. त्याने पात्रता फेरीत 633.7 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि नंतर अंतिम फेरीत 250.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक तटस्थ खेळाडू दमित्री पिमेनोवने 249.9 गुणांसह रौप्य, तर हिंदुस्थानच्या अभिनव सावने 228.4 गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली. याशिवाय हिंदुस्थानच्या नारायण प्रणव बनिता सुरेशने 187.0 गुणांसह पाचवे स्थान मिळवले.