
राज्यावर अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे गंभीर संकट ओढवले असताना महायुती सरकारने सर्वसामान्यांची ‘लूट’ सुरूच ठेवली आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामात एसटी बसगाडय़ांची 10 टक्के तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर यादरम्यान साधी निम आराम, शयन आसनी, शयनयान, वातानुकूलित शिवशाही (आसनी), जन शिवनेरी या बससेवेसाठी ही दरवाढ लागू असेल. या दरवाढीमुळे ऐन सणासुदीत राज्यभरातील एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेचे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारकडे योग्य त्या प्रमाणात भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. याबाबतीत महायुती सरकारने जनतेची निराशा केली असताना ‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटीची गर्दीच्या हंगामात 10 टक्के दरवाढ केली आहे. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल अशा प्रवाशांकडून आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक वसूल केला जाणार
आहे.
प्रति टप्पा भाडेआकारणी
बस प्रकार सध्याचा दर दिवाळी गर्दीच्या हंगामातील दर
साधी (साधी, मिडी) 10.05 11.05
जलद 10.05 11.05
निमआराम 13.65 15.00
साधी शयनआसनी 13.65 15.00
साधी शयनयान 14.75 16.25
वातानुकुलित शिवशाही (आसनी) 14.20 15.65
वातानुकूलित जन शिवनेरी (आसनी) 14.90 16.40



























































