
देशभरात राजकीय गदारोळाचा विषय ठरलेली बिहारमधील मतदार फेरछाननी (एसआयआर) अखेर पूर्ण झाली असून मतदारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार सुधारित यादीतून 68 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
बिहारमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात आयोगाने देशभरात मतदार फेरछाननीची घोषणा करण्यात आली होती. बिहारमध्ये याची सुरुवात करण्यात आली. ही फेरछाननी करताना आयोगाने मतदारांकडून मागवलेल्या कागदपत्रांवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद नंतर न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाला एसआयआरच्या पद्धतीत अनेक बदल करावे लागले. तब्बल तीन महिन्यांच्या या प्रक्रियेनंतर अंतिम यादी आज आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली.
बिहारमध्ये आता किती मतदार?
मतदार फेरछाननी सुरू होण्याआधी बिहारमध्ये एकूण 7.89 कोटी मतदार होते. नव्या यादीत ही संख्या 7.42 कोटींवर आली आहे. सुधारित यादीतून 68.66 लाख मतदारांची नावे कमी झाली आहेत, तर 21.53 लाख नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.


























































