
घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडेमहानवमी विजयादशमी दसरा दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
श्री विठ्ठलास नक्षी टोप, प्रभावळ सह, बालाजी नाम, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगण जोड, मस्त्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ १ पदरी, अष्टपैलू मण्याची कंठी ३ पदरी पदकासह, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवेची माळ २ पदरी, झनक झनक हार, एकदाणी, तंदळया हार ७ पदरी, लक्ष्मीहार, दंड्पेठ्या जोड मोठ्ठा. इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, मान्यमोत्याच्या पाटल्या जोड, सोन्यामोत्याचे तानवड जोड, मोठी नथ, वाळ्या जोड, चिंचपेटी हिरवी, मोत्याचे मंगळसूत्र, पवळ्याचा हार, खड्याची बिंदी, कोल्हापुरी साज, पुतळ्यांच्या माळा, पैंजण जोड, सरी, तुळशीची माल १ पदरी, ठुशी इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच राधिका मातेस सिध्देश्वर टोप, लक्ष्मीहार, जवमनी पदक, जवेची माळ व सत्यभामादेवीला लक्ष्मी टोप, हायकोल, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, चिंचपेटी तांबडी, इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आलेले आहेत.
तसेच दि. ०२ ऑक्टोंबर रोजी रिध्दी – सिध्दी गणपती मंदिरात विजया दशमी दसरा निम्मित दरवर्षीप्रमाणे सिमोल्लंघन साजरे करण्यात येत आहे, तसेच त्या ठिकाणी देखील आवश्यक त्या सोई सुविधा पुरविण्यात येत आहेत.
दि. ०३ ऑक्टोंबर रोजी एकादशी असल्याने भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने दर्शनरांगेत सुरक्षा रक्षक नियुक्ती, पाणी व चहा वाटप, बॅरीकेटींगची व्यवस्था विद्युत व्यवस्था इतर अनुषंगीक सोई सुविधा पुरेसा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.