
गुरुवारी 5 बाद 280 अशा सुस्थितीत असलेला विदर्भचा पहिला डाव 342 धावांवर गुंडाळण्यात शेष हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी यश मिळवले. मात्र फलंदाजीत त्यांच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि इराणी करंडकाच्या दुसऱ्या दिवसअखेर शेष हिंदुस्थानची 5 बाद 142 अशी घसरगुंडी उडाली. आता शेष हिंदुस्थान 200 धावांनी पिछाडीवर असल्यामुळे त्यांना तिसऱ्या दिवशी ही पिछाडी भरून काढणे सोपे नाही. परिणामतः विदर्भला इराणी करंडकावर आपली पकड अधिक घट्ट करण्याची नामी संधी आहे. शेष हिंदुस्थानला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी रजत पाटीदारला आपल्या बॅटची कमाल दाखवावी लागेल.
विदर्भचा डाव रोखल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या शेष हिंदुस्थानसाठी अभिमन्यू ईश्वरन (52) आणि आर्यन जुयाल यांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. पण 20 व्या षटकात दर्शन नालकंडेने जुयालला पायचीत केले. त्यानंतर यश ढुल 11 धावांवर बाद झाला. शेष हिंदुस्थानचा तिसरा विकेट म्हणून अभिमन्यू ईश्वरन बाद झाला. त्याला पार्थ रेखडेने पायचीत केले. ईश्वरनने 112 चेंडूंत सहा चौकारांसह 52 धावा केल्या.
कर्णधार ऋतुराज गायकवाड (9) आणि ईशान किशन (1)ही स्वस्तात बाद झाले. दिवसअखेरीस रजत पाटीदार 42 आणि मानव सुथार 1 धावांवर नाबाद राहिले. शेष हिंदुस्थान अद्याप विदर्भच्या धावसंख्येपेक्षा 200 धावांनी पिछाडीवर आहे. विदर्भसाठी पार्थ रेखडेने 2 तर दर्शन नालकंडे, हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
त्याआधी, विदर्भने गुरुवारच्या 5 बाद 280 धावांपासून खेळ पुढे नेला. यश ठाकूर (11) हा पहिला गडी 249 धावांवर बाद झाला. त्यानंतर हर्ष दुबे शून्यावर आणि दर्शन नालकंडे 20 धावांवर बाद झाला. अथर्व तायडेने लढवय्या खेळी साकारत 283 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकारासह 143 धावा केल्या. सारांश जैनने 99 व्या षटकात तायडेला बाद करून शेष हिंदुस्थानला मोठी दिलासा दिला. पुढे त्याने आदित्य ठाकरेला (2) झेलबाद करून विदर्भची खेळी 101.4 षटकांत 342 धावांवर संपवला. शेष हिंदुस्थानसाठी आकाश दीप आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. सारांश जैनने 2 तर अंशुल कम्बोज आणि गुरनूर बरार यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.